पाटणा :– खिडकी बंद करण्याच्या क्षुल्लक विषयावरून मुख्याध्यापिका आणि शिक्षिकेत अगोदर शाब्दिक चकमक झाली व त्यानंतर त्या शिक्षिकेने अन्य एका शिक्षिकेच्या मदतीने मुख्याध्यापिकेला अगोदर वर्गात आणि नंतर बाहेरही मारहाण केली. या धक्कादायक व्हिडिओची सत्यता पडताळून पाहण्याचे काम सुरू होते. मात्र ही घटना बिहारच्या एका शाळेत घडली असल्याचे सांगण्यात आले. विशेष म्हणजे हाणामारीचा हा प्रकार शाळेतच बघ्यांच्या समोर घडला.
कोरिया पंचायत विद्यालयातील हा प्रकार आहे. खिडकी बंद करण्याच्या मुद्द्यावरून मुख्याध्यापिका कांती कुमारी आणि शिक्षिक अनिता कुमारी यांच्यात शाब्दीक चकमक सुरू झाली. विद्यार्थी खिडकीतून हा प्रकार पाहत होते. त्यानंतर कांती कुमारी यांना ओढत खोलीबाहेर नेण्यात आले.
तेवढ्यात दुसरी महिला (बहुदा शिक्षिका) चप्पल घेऊन त्यांच्या अंगावर धावून गेली. या दोघींनी कांतीकुमारी यांना ओढत मोकळ्या जागेवर नेले आणि चपलेने त्यांना मारहाण केली व बुक्केही मारली. भांडण पाहणाऱ्यांतील कोणीतरी मध्ये पडून अखेर त्यांना वेगळे केले.
दरम्यान, या भांडणाचा शाळेशी काही संबंध नसून त्यांचे खासगी भांडण असल्याचे ब्लॉक शिक्षणाधिकारी नरेश यांनी सांगितले. मात्र शाळेतच महिला शिक्षिकांच्या मारहाणीचा हा प्रकार धक्कादायक आणि तितकाच लाजीरवाणा ठरला आहे.