राहुल गांधींना अध्यक्षपदावर कायम राहण्याचे साकडे
पाटणा – बिहारमधील काही कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी राहुल गांधींनी राजीनामा मागे न घेतल्यास सामूहिकरित्या आत्मदहनाचा इशारा दिला आहे.
कॉंग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर शनिवारी राहुल गांधी पहिल्यांदाच बिहारच्या दौऱ्यावर आले होते. त्यावेळी पाटण्यातील कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी शहरामध्ये काही ठिकाणी राहुल गांधींच्या स्वागताचे प्लेक्स लावले होते. तसेच त्यावर राहुल गांधींनी राजीनामा मागे घ्यावा आणि कॉंग्रेस अध्यक्षपदावर कायम राहावे अशी इच्छा व्यक्त केली आहे. तसेच राहुल गांधींनी राजीनामा मागे न घेतल्यास आम्ही 12 जण 11 जुलै रोजी दुपारी 1 वाजता आत्मदहन करू, अशा शब्दांत त्यांनी दबाव टाकण्याचा प्रयत्न केला आहे.
यापूर्वी देखील राहुल गांधींनी राजीनामा मागे घ्यावा यासाठी राजस्थानातील एका कॉंग्रेस कार्यकर्त्याने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, घटनास्थळी असलेल्या लोकांनी आणि पोलिसांनी त्याला असे करण्यापासून रोखले होते.
लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसचा दारुण पराभव झाल्याची नैतिक जबाबदारी स्वीकारत राहुल गांधी यांनी निकालानंतर काही दिवसांतच कॉंग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. मात्र, त्यांचा राजीनामा पक्षाने अद्याप स्वीकारलेला नाही. मात्र, राहुल गांधींचीच या पदावर राहण्याची इच्छा नसल्याने त्यांनी स्पष्ट केले आहे.