पाटणा – बिहारमध्ये नितीश कुमार मंत्रिमंडळाचा आज विस्तार करण्यात आला आणि 17 नवीन मंत्र्यांचा समावेश करण्यात आला. भाजप नेते शाहनवाझ हुसैन यांना या नवीन मंत्र्यांमध्ये मंत्रीपद देण्यात आले आहे.
माजी केंद्रीय मंत्री आणि पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते असलेल्या शाहनवाझ हुसैन यांची गेल्या महिन्यात बिहारच्या विधान परिषदेवर निवड झाली होती. आज राज्यपाल फगू चौहान यांनी मंत्रीपदाची शपथ दिलेल्या 17 मंत्र्यांमध्ये शाहनवाझ हुसैन यांच्यासह भाजपच्या 9 मंत्र्यांचा समावेश आहे.
यामुळे बिहारच्या मंत्रिमंडळामध्ये भाजपचे 20 मंत्री झाले आहेत. तर मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या संयुक्त जनता दलाच्या 8 जणांनी आज शपथ घेतली. मंत्रिमंडळात जेडियुचे आता 12 मंत्री झाले आहेत. निकषानुसार राज्य मंत्रिमंडळामध्ये मुख्यमंत्र्यांसह 36 मंत्री असू शकतात.
आज झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारामुळे मंत्रिमंडळातील मंत्र्यांची एकूण संख्या 34 झाली आहे. हिंदुस्थानी आवामी मोर्चा आणि विकासशील इन्सान पार्टी या पक्षांचे प्रत्येकी एकजण मंत्री आहेत. पूर्वीच्या मंत्रिमंडळातील प्रमोद कुमार वगळता भाजपने सर्व नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. तर जेडियुने अनुभवी नेत्यांनाच मंत्रीपद दिले आहे.
मंत्र्यांच्या खातेवाटपाबाबतचा निर्णय झाला असून त्याबाबत लवकरच घोषणा केली जाईल, असे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी शपथविधीच्या समारंभानंतर पत्रकारांना सांगितले.