पाटना: संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीच्या अंतिम टप्प्यातील प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे. तिसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यात 15 जिल्ह्यातील 78 मतदारसंघात 7 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. या टप्प्यात एकूण 1 हजार 208 उमेदवार निवडणुकीच्या मैदानात आहेत.
बिहार विधानसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील मतदानासह वाल्मिकीनगर लोकसभा मतदारसंघातही पोटनिवडणूक होणार आहे. याठिकाणी 7 उमेदवार रिंगणात आहेत. मुजफ्फरपूर मतदारसंघात सर्वाधिक 28 उमेदवारांनी दंड थोपटले आहेत. तर जोकीहाट, बहादूरगंज, त्रिवेणीगंज आणि ढाका या मतदारसंघात प्रत्येकी 9 उमेदवार आमने-सामने आहेत.
शेवटच्या टप्प्यात सीमांचल या मुस्लीम बहुल भागात जोरदार संघर्ष पाहायला मिळण्याची शक्यता आहे. तर यादव बहुल कोसी आणि ब्राह्मण बहुल मिथिलांचलमधील काही जागांवरही कांटे की टक्कर होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, विद्यमान मुख्यमंत्री नितीश कुमार निवडणुक प्रचारासाठी 3 नोव्हेंबरला बिहारच्या मधुबनी जिल्ह्यातील हरलाथी विधानसभा क्षेत्रात सभा घेण्यासाठी गेले होते. त्यावेळी भाषण करत असताना एका व्यक्तीने त्यांच्या अंगावर कांदे फेकले. यावेळी त्या व्यक्तीने भर प्रचारसभेत नितीश कुमार विरोधात घोषणाबाजी केली.