बिगुल वाजला…(अग्रलेख)

देशातील सर्वांत विकसित आणि प्रभावशाली राज्य असलेल्या महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक अखेर जाहीर झाली असल्याने सर्वच स्तरावर लगबग सुरू झाली आहे. निवडणुकीचा बिगुल वाजल्याने सर्व संबंधित घटक जागे झाले आहेत. पुढील महिन्यात दिवाळीपूर्वी राज्यात नवीन सरकार सत्तारूढ झाले असेल; पण कोणतीही निवडणूक म्हटली की, जी उत्सुकता आणि हुरहूर जाणवते त्याचा अभाव यावेळी जाणवत आहे. एकतर सत्ताधारी भाजप आणि शिवसेना युतीने आपला विजय निश्‍चित मानला आहे आणि दुसरीकडे विरोधी पक्षांचे मनोधैर्य काही प्रमाणात खचले आहे. त्यातच काही वृत्तवाहिन्यांनी ओपिनियन पोलचे जे आकडे जाहीर केले आहेत ते सत्ताधारी पक्षाला अनुकूल आहे. साधारण चार महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीच्यावेळी देशात भाजप आणि नरेंद्र मोदी यांच्या विरोधात वातावरण तयार करण्यात विरोधी पक्षांना यश आले होते; पण त्याचा फायदा निवडणुकीत झाला नाही आणि मोदीच पुन्हा सत्तेवर आले.

महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाजनादेश यात्रेच्यानिमित्ताने चांगली वातावरण निर्मिती केली; पण विरोधकांना सरकारविरोधी वातावरण तयार करण्यात यश आले नाही. लोकसभा निवडणुकीतील पराभवामुळे खचलेल्या विरोधकांकडे मुद्दे नाहीत किंवा मुद्दे असतील तर ते प्रभावीपणे मांडण्याची इच्छाशक्‍ती नाही. थोडक्‍यात, सत्ताधारी पक्षाला अनुकूल असणाऱ्या वातावरणात विधानसभा निवडणुकीचा हा बिगुल वाजला आहे. साहजिकच आगामी काही दिवसांत विरोधी पक्ष सत्ताधाऱ्यांसमोर किती प्रमाणात आव्हान उभे करतात यावर सारेकाही अवलंबून आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत सर्वच पक्ष स्वबळावर लढले असल्याने प्रत्येकाला आपली ताकद समजली होती. त्यातूनच बोध घेऊन कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी यांनी आधीच आपल्या आघाडीची घोषणा केली आहे आणि फिफ्टी फिफ्टी फॉर्म्युला जाहीर करून टाकला आहे.

दुसरीकडे भाजप आणि शिवसेना यांची युती असली तरी जागावाटपाचा फॉर्म्युला कळीचा मुद्दा बनू पाहत आहे. हा मुद्दा सुटेपर्यंत पुढचे पाऊल पडणे अशक्‍य आहे. स्वबळावर पुन्हा निवडणूक लढवली तरी भाजप पुन्हा सर्वांत मोठा पक्ष ठरू शकतो अशी शक्‍यता आहे. भाजपसमोर कोणतीही समस्या नाही; पण शिवसेनेला मात्र आपला सन्मान कायम ठेवून जागावाटपावर तोडगा काढावा लागणार आहे. राज्यातील शिवसेनेची मोठ्या भावाची भूमिका भाजपने कधीच आपल्याकडे घेतल्याने भाजप शिवसेनेला निम्म्या जागा देण्याची शक्‍यता नाही.

आदित्य ठाकरे यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवण्याच्या तयारीत असलेल्या शिवसेनेला शेवटी भाजपची ऑफर मान्य करूनच निवडणुकीत उतरावे लागेल. जरी या पक्षांचा जागावाटपाचा प्रश्‍न सुटला तरी उमेदवारीवरून नवीन संघर्ष निर्माण होण्याची शक्‍यता आहे कारण गेल्या काही दिवसांत मेगाभरतीच्या नावाखाली भाजपने इतक्‍या लोकांना आपल्या पक्षात घेतले आहे की उमेदवारी कोणाला द्यायची याचा वाद निर्माण होऊ शकतो. अर्थात, लोकसभेवेळचे चित्र पाहिले तर भाजप अनेक विद्यमान आमदारांना डच्चू देऊन या प्रश्‍नावर तोडगा काढू शकतो; पण गेल्या निवडणुकीत एकमेकांच्या समोर ठाकलेल्या भाजप आणि शिवसेना यांना यावेळी एकमेकांना मतदारसंघ सोडताना खूप कसरत करावी लागणार आहे. म्हणजेच सत्ताधाऱ्यांकडे आत्मविश्‍वास असला तरी प्रचाराच्या मैदानात उतरण्यासाठी त्यांना थोडा विलंब लागू शकतो. त्याचा फायदा विरोधक कसा करून घेतात हे पाहावे लागेल.

अनेक दिग्गजांनी पक्ष सोडल्याने दुखावले गेलेले राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी ही निवडणूक खूपच गांभीर्याने घेतली आहे. वयाच्या 80व्या वर्षीही त्यांनी झंझावाती दौरे चालू ठेवले आहेत. त्यांच्या या सकारात्मक वृत्तीमुळे कार्यकर्त्यांना बळ मिळेल; पण पक्षातील सर्वांनीच ही निवडणूक इतकीच गांभीर्याने घेतली तर सत्ताधाऱ्याना आव्हान उभे करण्यात शरद पवार यशस्वी ठरू शकतात. कॉंग्रेस पक्षालाही तेवढेच गांभीर्य दाखवून निवडणुकीत उतरावे लागेल. पक्षांतर्गत गटबाजीने पछाडलेल्या या पक्षाला आता एकजुटीने मैदानात उतरावे लागेल. गेल्या पाच वर्षांत फडणवीस सरकारने काहीच केले नाही असा आरोप पत्रकार परिषदेत करणारे या पक्षांचे नेते मतदारांपर्यंत हे आरोप पोहोचवण्यात यशस्वी होतात का हे पाहावे लागेल. पाच वर्षांत केलेली कामे आणि काश्‍मीरबाबतचे कलम 370 रद्द करणे हे विषय घेऊनच मैदानात उतरण्याची रणनीती आखलेल्या भाजपला उत्तर देण्यासाठी एखादी सक्षम रणनीती विरोधकांना तयार करावी लागेल.

देशभक्‍तीच्या भावनेवर मत मागण्याची सत्ताधाऱ्यांची रणनीती विरोधकांच्या लक्षात आली असेल तरच ते त्याला उत्तर देऊ शकतील. राज्यातील या चार प्रमुख पक्षांशिवाय प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी आणि राज ठाकरे यांचा मनसे या पक्षांची भूमिकाही महत्त्वाची ठरणार आहे. प्रकाश आंबेडकर यांनी अनेकवेळा आवाहन करूनही कॉंग्रेसने त्यांच्याशी आघाडी करण्याचा विचार केला नाही. साहजिकच लोकसभेला ज्याप्रमाणे वंचित आघाडीने मोठ्या प्रमाणात मते मिळवली होती तसेच यावेळी घडणे अपरिहार्य आहे.

राज्यात वंचित बहुजन आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळाले तर आश्‍चर्य वाटायला नको, हे फडणवीस यांचे विधान म्हणूनच मोठे सूचक आहे. राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणूक न लढवता त्यावेळी विरोधकांचा प्रचार केला असला तरी यावेळी त्यांचा पक्ष काही जागा तरी लढवणार आहे. भाजप आणि शिवसेना यांचा प्रभाव असलेल्या शहरी भागातच मनसे आपले उमेदवार उभे करण्याची शक्‍यता असल्याने त्याचा थोडाफार फटका या पक्षांना बसू शकतो. त्याचा विचार भाजप आणि शिवसेना यांना करावा लागेल. निवडणूक व्यवस्थापनात कुशल असलेल्या भाजपला सध्याच्या अनुकूल वातावरणाचा संपूर्ण फायदा करून घेऊन पुन्हा सत्तेवर येण्याचा विश्‍वास असला तरी त्यांनाही गाफील राहून चालणार नाही. मतदारांच्या मनात नक्‍की काय आहे हे कधीच समजत नाही. आगामी काळात धडाडणाऱ्या प्रचार तोफांच्या माध्यमातून चित्र स्पष्ट होईल. निवडणुकीच्या लोकशाहीचा अविभाज्य भाग असलेल्या मतदारावरच सारे काही अवलंबून आहे हे कोणत्याच पक्षाला विसरता येणार नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.