नवी दिल्ली – भारत-अमेरिका यांच्यातला युद्ध अभ्यास-२०२४ हा युद्धसराव राजस्थानमधील महाजन फील्ड फायरिंग रेंजमधील परदेशी प्रशिक्षण नोड येथे आजपासून सुरू झाला. हा सराव ९ ते २२ सप्टेंबर या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे. २००४ पासून दरवर्षी युद्ध अभ्यास हा सराव भारत आणि अमेरिकेत आळीपाळीने आयोजित केला जातो.
राजपूत रेजिमेंटच्या एका बटालियनसह इतर सैन्य दले आणि सेवांमधील ६०० जवानांचा समावेश असलेली सैनिकांची तुकडी भारतीय सैन्य दलाचे प्रतिनिधित्व करत आहे. तर अमेरिकेच्या तुकडीचे प्रतिनिधित्व अमेरिकन सैन्याच्या अलास्का स्थित ११ व्या एअरबोर्न डिव्हिजनच्या १-२४ बटालियनची तुकडी करत आहे.
राष्ट्रीय सुरक्षेला देशांतर्गत धोका असल्याच्या परिस्थितीत दहशतवादविरोधी कारवाई करण्यासाठी दोन्ही बाजूंची संयुक्त लष्करी क्षमता वाढवणे हा या सरावाचा उद्देश आहे.