कलर्स मराठीवरील सर्वांत चर्चित आणि प्रेक्षकांच्या आवडीची मालिका म्हणजे “बिग बॉस मराठी’. या शोचे पहिले पर्व 15 एप्रिल 2018मध्ये यशस्वीपणे पार पडले आणि तितक्याच धमाकेदारपणे गाजले. या पर्वामध्ये अभिनेत्री मेघा धाडे विजयी ठरली होती.
मालिकेने संपूर्ण टीआरपी रेट स्वत:कडे खेचून घेतला होता. पहिल्या पर्वाची झिंग प्रेक्षकांच्या डोक्यातून उतरण्याअगोदरच दुसरे पर्व भेटीला आले. दुसरा सिझनही तितक्याच जोशाने गाजला होता.
या दुसऱ्या सिझनमध्ये शिव ठाकरेने “बिग बॉस मराठी 2’ची ट्रॉफी जिंकली. शोमधील स्पर्धकांची ओळख संपूर्ण महाराष्ट्रभर झाली. यामुळे आता प्रेक्षक तिसऱ्या पर्वाची आतुरतेने वाट पाहात आहेत. कलर्स मराठीने नुकतीच “बिग बॉस मराठी 3’च्या आगामी पर्वाची अधिकृत घोषणा केली आहे.
यामुळे चाहत्यांमधील उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. कलर्स मराठीने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत “बिग बॉस मराठी 3′ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे जाहीर केले. तसेच “दार परत उघडणार आणि एकच आवाज घुमणार, कारण येतोय बिग बॉस 3. लवकरच कलर्स मराठी 3वर’ असे कॅप्शन दिले आहे.
“बिग बॉस मराठी 3′ या आगामी सिझनचे सूत्रसंचालन महेश मांजरेकरच करणार आहे. प्रेक्षकांना बिग बॉस पर्वात कोण कोण स्पर्धक सहभागी होणार आहे याची उत्सुकता सर्वाधिक असते. तसेच घरात कोणते टास्क रंगणार आणि यंदाच्या पर्वात नेमकी कोणती थिम असणार? असे बरेच प्रश्न प्रेक्षकांना पडले आहे.