मोठी बातमी! ‘या’ तारखेनंतर होणार लाॅकडाऊनचा निर्णय; टास्क फोर्सच्या बैठकीनंतर आरोग्यमंत्र्यांनी दिली माहिती

मुंबई – राज्यात वाढत्या करोनाच्या पार्श्वभूमीवर लाॅकडाऊन लागू करण्यासंदर्भात हालचाली सुरु आहेत. काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. त्यात सत्ताधारी तसेच विरोधी पक्षातील नेत्यांनी लाॅकडाऊनबाबतच्या निर्णयाला पाठिंबा दर्शवला होता. आज दोन तास चाललेल्या टास्क फोर्सच्या बैठकीनंतर लाॅकडाऊनसंदर्भात निर्णय घेतला जाण्याची शक्यता होती मात्र, 14 तारखेनंतर मंत्रीमंडळाच्या बैठकीनंतर लाॅकडाऊन संदर्भात निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्यात लॉकडाऊन करणं हाच पर्याय असल्याचं काल सर्वपक्षीय बैठकीत मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं. आज या संदर्भात टास्क फोर्ससोबत बैठक झाली. या बैठकीत कोरोना आटोक्यात आणायचा असेल तर राज्यात 14 दिवसांचा कडक लॉकडाऊन हवा असं कोविड टास्क फोर्सच्या सदस्यांनी मत व्यक्त केलं आहे. दरम्यान आता लाॅकडाऊनचा निर्णय हा 14 तारखेनंतरच होणार असल्याची माहिती टोपे यांनी दिली आहे. तसेच उद्या अर्थविभाग आणि इतर विभागाशी मुख्यमंत्री चर्चा करणार आहेत.

दरम्यान, राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस काल सर्वपक्षीय बैठकीत म्हणाले होते की, कोरोनाची चाचणी केल्यावर रिपोर्ट तात्काळ मिळतील याची व्यवस्था करणं आवश्यक आहे. रेमडिसिवीर तात्काळ कसे उपलब्ध करून देता येईल हे पाहणे महत्वाचे आहे. जनतेमधील उद्रेक लक्षात घेऊन नागरिकांच्या दृष्ठीने निर्णय घ्यावा लागेल. काही जण तर आम्ही मलो तरी चालेल पण आम्हाला धंदा करू द्यात असं म्हणणारे आहेत, त्यासाठी आपण अशा लोकांचाही विचार करावा. सर्व कर आणि कर्ज फेडावं लागत आहे अशा परीस्थितीत कस घर चालवायचं असा प्रश्नं आहे. हातावर पोट असणाऱ्यांची सरकारने सोय करावी, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले होते.

एकंदरीत सर्व परिस्थिती पाहता राज्यात लाॅकडाऊन लागणार हे नक्की आहे. उद्या अर्थविभाग आणि इतर काही विभागाशी मुख्यमंत्री चर्चा करणार आहेत. त्यानंतर बुधवारी 14 तारखेला मंत्रिमंडळाची बैठक होणार असून त्यानंतरच लाॅकडाऊनसंदर्भात निर्णय होण्याची शक्यता आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.