नाशिक – नाशिकमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. नुकतंच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नाशिकचे संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी यांनी शिंदे गटात प्रवेश केला. विशेष म्हणजे चौधरी हे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचे अतिशय निकटवर्तीय होते. त्यामुळे हा संजय राऊत यांच्यासाठी मोठा धक्का मनाला जात आहे.
ठाकरे गटाला याआधीच चौधरी हे शिंदे गटात जाणार असल्याची कुणकुण लागली होती त्यामुळे प्रवेशापूर्वीच त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. स्वतः संजय राऊत यांनी याबाबत ट्विट करून माहिती दिली. “शिवसेना नाशिक जिल्हा संपर्क प्रमुख भाऊ चौधरी यांची शिवसेना तसेच संपर्क प्रमुख पदावरून हकालपट्टी करण्यात येत आहे.शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने ही कारवाई करण्यात येत आहे” अशा आशयाचे ट्विट राऊत यांनी केले.
शिवसेना नाशिक जिल्हा संपर्क प्रमुख भाऊ चौधरी यांची शिवसेना तसेच संपर्क प्रमुख पदावरून हकालपट्टी करण्यात येत आहे.शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने ही कारवाई करण्यात येत आहे@OfficeofUT
— Sanjay Raut (@rautsanjay61) December 21, 2022
भाऊसाहेब चौधरी हे संजय राऊत यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. राऊत हे पत्राचाळ प्रकरणी तुरुंगात असताना त्यांच्या जामिनासाठी सुनील राऊत आणि भाऊसाहेब चौधरी यांनी सह्या केल्या असल्याची माहिती एका मराठी वृत्तवाहिनीने दिली आहे. त्यामुळे शिंदे गटाने राऊत यांच्या निकटवर्तीयांनाच सोबत घेतल्याने राजकीय वातावरण पुन्हा तापायला सुरुवात झाली आहे.