Ajit Pawar : एकेकाळी पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फुटीनंतर जसा राज्य पातळीवर पक्षाला फटाका बसला, तसाच स्थानिक पातळीवरही बसला. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या काळात अनेक राजकीय घडामोडी अत्यंत वेगाने घडल्या. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षात असलेले अजित गव्हाणे यांनी विधानसभा निवडणुकीला भोसरी विधानसभेची उमेदवारी न मिळाल्याने शरद पवार गटात प्रवेश केला होता. मात्र, आता गव्हाणे स्वगृही परतले आहेत.
काल १७ जून रोजी पिंपरी चिंचवड येथील कार्यकर्ता मेळाव्यात पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत शरद पवार गटाचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी काही माजी नगरसेवकांसह राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षात जाहीर पक्षप्रवेश केला. त्यांच्या जाण्याने शरद पवार यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
गेल्या काही काळापासून अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अजित गव्हाणे पक्षप्रवेश करणार असल्याच्या चर्चा पिंपरी चिंचवडच्या राजकारणात रंगल्या होत्या. तसेच गव्हाणे यांनी अजित पवार यांच्या भेट देखील घेतली होती. आता तर त्यांनी जाहीर पक्षप्रवेश केला करून चर्चांना पूर्णविराम दिला आहे.
या पक्षप्रवेश सोहळ्याला विधानसभेचे उपाध्यक्ष आण्णा बनसोडे, भोसरी विधानसभेचे आमदार विलासशेठ लांडे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. या कार्यक्रमात अजित पवार यांनी त्यांच्या स्टाईलने फटकेबाजी केली. ते शरीराने तिकडं होते. मनाने मात्र आपल्यासोबत होते, हे मला जाणवं होतं, असं गव्हाणे यांच्याबद्दल पवार यावेळी बोलताना म्हणाले.
पुणे जिल्ह्यातील भोसरी येथे कार्यकर्ता मेळावा संपन्न झाला. यावेळी पिंपरी चिंचवड शहर – पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम देखील पार पडला. यावेळी श्री. अजित गव्हाणे आणि ३५ हून अधिक आजी माजी नगरसेवक तसेच विविध पक्षातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला,… pic.twitter.com/aokZQ8D4dH
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) June 17, 2025
काही दिवसांपूर्वी अजित गव्हाणे हे भोसरी विधानसभा निवडणूक लढण्यासाठी दुसऱ्या पक्षात गेले. मात्र, ते शरीराने तिकडं होते, मनाने मात्र आपल्यासोबत होते हे मला ही जाणवत होतं. विधानसभा निवडणुकीच्या पराभवानंतर अजित गव्हाणे माझ्या संपर्कात होते. आता आम्हाला मान-सन्मान द्या, अशी चर्चा माझ्याशी होत होती, असे अजित पवार यांनी सांगितले.
भाजपला टोला
महाराष्ट्रात शिव, शाहू, फुले, आंबेडकर यांचे विचार रुजलेले आहेत. आपण तेच विचार घेऊन पुढे घेऊन जात आहे. मधल्या काळात आपलेच पदाधिकारी घेऊन त्यांना पदं देऊन इथं बदल घडवला. भाजपचे दिवंगत लक्ष्मण जगताप आणि महेश लांडगे यांना उद्देशून अजित पवारांनी भाजपला टोला लगावला.
विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान अजित गव्हाणे हे भोसरी विधानसभेची निवडणूक लढविण्यास इच्छुक होते. मात्र, महायुतीमध्ये भोसरीची जागा भाजपला सुटली. त्यानंतर गव्हाणे नाराज झाले होते. त्यांनी शरद पवार गटात पक्षप्रवेश करत भोसरी विधानसभेची निवडणूक लढविली होती. मात्र ते पराभूत झाले. या विधानसभा क्षेत्रातून पुन्हा एकदा भाजपचे महेश लांडगे हे आमदार म्हणून निवडून आले.
हेही वाचा: Satara news : कृष्णा, कोयना गढूळ; दुषित पाण्याचा धोका ! आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर