मुंबई : राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पक्षाला मोठा धक्का बसला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने राज ठाकरेंना हा धक्का दिला आहे. मनसेचे विद्यार्थी सेनेचे सरचिटणीस अखिल चित्रे यांनी राज ठाकरेंना जय महाराष्ट्र करत उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षात जाहीर प्रवेश केला आहे.
अखिल चित्रे हे मनसेचे तडफदार नेते मानले जायचे. पण त्यांनी अचानक विधानसभेच्या काळात ठाकरे गटात प्रवेश केल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. वांद्रे पूर्व मतदारसंघात मनसेकडून तृप्ती सावंत यांना विधानसभेचं तिकीट दिल्याने अखिल चित्रे नाराज होते. अखेर त्यांनी आज मनसेला सोडचिठ्ठी देऊन सर्वांना धक्का दिला.
ट्विट करून दिला राजीनामा
“अखेर मला पक्षाबाहेर ढकलण्यात त्यांना यश आलं. खंत एकच की खंजीर समोरून नाही, मागून नाही तर शेजारी बसून खुपसला गेला. राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलं आहे सावध रहा. असो, जय महाराष्ट्र!”, असं अखिल चित्रे यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
पक्षप्रवेशावर दिली ‘ही’ प्रतिक्रिया
“माझी राजकीय सुरुवात केली होती तेव्हा मी भारतीय विद्यार्थी सेनेचा युनिट प्रमुख, कॉलेजप्रमुख म्हणून सुरुवात केली होती. मी ज्या ठिकाणाहून राजकारण सुरु केलं होतं अगदी त्याच ठिकाणावर परत यावं, असं मला वाटलं. त्यामुळे मी पुन्हा या पक्षात प्रवेश केला आहे”, असं अखिल चित्रे यांनी स्पष्ट केलं.