सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसला मोठा धक्का

वाई, खंडाळा, महाबळेश्‍वरमधील अनेक कार्यकर्ते भाजपमध्ये, शिवेंद्रराजेंच्या प्रवेशाचे स्पष्ट संकेत
लक्ष्मी कऱ्हाडकर, आनंदराव शेळके पाटील भाजपमध्ये दाखल

सातारा  – विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर सातारा जिल्ह्यातील घडामोडींना वेग येत चालला असून जिल्ह्यात बलाढ्य समजल्या जाणाऱ्या राष्ट्रवादी कॉंग्रेसला आणि कॉंग्रेसला धक्का देण्याचे तंत्र भारतीय जनता पक्षाने अवलंबले आहे. त्यामुळेच वाई विधानसभा मतदारसंघातील वाई, खंडाळा, महाबळेश्‍वर तालुक्‍यांतील अनेक कार्यकर्त्यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. त्यात पाचगणीच्या नगराध्यक्षा लक्ष्मी कऱ्हाडकर, जिल्हा परिषदेचे माजी सभापती आनंदराव शेळके पाटील यांच्यासह काही आजी माजी नगरसेवक व पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. सातारा मतदारसंघातील आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या भाजप प्रवेश निश्‍चित झाल्याचे संकेत आज प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत स्पष्ट झाले.

मुंबई :वाई, खंडाळा, महाबळेश्‍वर विधानसभा मतदारसंघाच्या तिन्ही तालुक्‍यांतील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी मुंबईंत भाजपचे प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपत प्रवेश केला. या प्रवेशाने राष्ट्रवादीला खिंडार पडले आहे. मदन भोसले सभागृहात दिसणारच, अशी ग्वाही चंद्रकांत पाटील यांनी यावेळी दिली.

माजी आमदार मदन भोसले यांच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्यसैनिक भिलारे गुरुजी यांचे सुपुत्र अशोकराव भिलारे, जिल्हा परिषदेचे माजी समाजकल्याण सभापती आनंदराव शेळके पाटील, पाचगणीच्या नगराध्यक्षा लक्ष्मी कऱ्हाडकर, महाबळेश्‍वरचे माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक किसनराव शिंदे यांच्यासह महाबळेश्‍वरचे नगरसेवक सुनील शिंदे, माजी नगरसेवक प्रशांत आखाडे, मेटगुताडचे माजी सरपंच नंदकुमार बावळेकर, रामचंद्र शिंदे, हेमंत शिंदे यांनी, पाचगणीतील माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक दिलावर बागवान, नगरसेविका उज्ज्वला महाडिक यांनी तर खंडाळा तालुक्‍यातील प्रदीप क्षीरसागर, अशोक धायगुडे, बबनराव शेळके, हर्षवर्धन शेळके पाटील आणि केंजळ येथील जयप्रकाश जगताप यांनी आपल्या समर्थकांसह भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी त्यांचे पक्षाचे उपरणे, दिशादर्शक दिवा व पुष्पगुच्छ देवून स्वागत केले.

पाटील म्हणाले, “”गेल्या पाच वर्षात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्या ताकदीने आणि विश्‍वासाने काम केले आहे, ज्या धडाडीने निर्णय घेतले आहेत त्यामुळे तमाम जनतेत हेच सरकार पुन्हा सत्तेत येणार हा विश्‍वास निर्माण झाला आहे. ज्यांना ज्यांना जनतेची नाडी कळते ते सर्वजण त्यामुळेच भाजपत येत आहेत. त्याची प्रक्रिया वाई विधानसभा मतदारसंघातही पार पडली. वाई, खंडाळा व महाबळेश्‍वरमधील अजूनही अनेकजण आपल्या संपर्कात असून त्यांचाही लवकरच प्रवेश होईल.” मदन भोसले यांच्या पाठीशी मुख्यमंत्री व संपूर्ण सरकार ठामपणे उभे आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली सुरु असलेले काम समाधानकारक आहे. त्यामुळे मदन भोसले विधिमंडळाच्या सभागृहात दिसणारच हा शब्द मी तुम्हाला देतो, अशी ग्वाही त्यांनी दिली. गेल्या पाच वर्षात केलेल्या कामाची माहिती यावेळी देऊन चंद्रकांत पाटील यांनी कोणाला भीती दाखवून पक्षात आणले जात नाही तर लोक स्वत:हून येत असल्याचे सांगितले.

मदन भोसले म्हणाले, “”वाई, खंडाळा आणि महाबळेश्‍वर तालुक्‍यांसह ज्या ज्या ठिकाणचे प्रश्‍न मांडले ते गतीने सोडविण्यास राज्य सरकारने सहकार्य केले. एवढ्या ताकदीने आणि तडफेने काम करणारे सरकार असेल तर जनतेला दिलासा आणि पदाधिकारी, कार्यकर्त्यांना बळ मिळतं. अनेक महत्वपूर्ण तसेच वर्षानुवर्ष रखडलेले प्रश्‍न सोडविण्याची किमया या सरकारने दाखवली, हेच सरकार आणखी दहा वर्ष सत्तेवर राहिल्यास प्रश्‍नच शिल्लक राहणार नाहीत, असा विश्‍वास जनतेत आहे. त्यामुळेच भाजपत येवू इच्छिणाऱ्यांची संख्या वाढत आहे. त्याचा ट्रेलर आज झाला असून लवकरच इतरही अनेकजण भाजपत दाखल होतील. दरम्यान, भाजप वाई तालुका उद्योग आघाडीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल दत्ता ढेकाणे यांचा सत्कार चंद्रकांत पाटील यांनी केला.

यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, भाजप नेते अनिल जाधव, यशवंत लेले, तानाजीराव भिलारे, पंचायत समिती सदस्य दीपक ननावरे, वाईचे नगरसेवक सतीश वैराट, नीलेश महाडिक, उषाताई ओंबळे, यशराज भोसले, संतोष कवी, चेतन पार्टे, शेखर भिलारे, मधुकर बिरामणे, तिन्ही तालुक्‍यातील पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. मदन भोसले यांनी पाटील यांचे स्वागत केले तर राज्य मजूर फेडरेशनचे संचालक सतीश भोसले यांनी आभार मानले.

भिलारे स्वत:हून.. कऱ्हाडकर स्टार

लक्ष्मी कऱ्हाडकर यांच्या प्रवेशावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले, “आजच्या कार्यक्रमाच्या लक्ष्मी कऱ्हाडकर या स्टार आहेत.’ कै. भिलारे गुरुजी यांचे सुपुत्र अशोकराव भिलारे यांचा प्रवेश झाला तेव्हा ते म्हणाले, “भिलारे यांना आपण धरुन, घाबरवून आणलं, असं कोणी तरी म्हणेल. पण आपण सर्वजण पाहतच आहात, या सरकारने केलेले काम या सर्व घडामोडींना कारणीभूत आहे.’

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.