स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या तिकीट विक्रीत मोठा घोटाळा; चौकशी सुरु

अहमदाबाद – गुजरातच्या सरदार सरोवर डॅमजवळ सरदार वल्लभभाई पटेल यांचा अतिभव्य पुतळा उभारण्यात आला आहे. स्टॅच्यू ऑफ युनिटी या नावाने तो ओळखला जातो. अल्पावधीतच हा भाग पर्यटकांच्या पसंतीचे स्थळ बनला आहे.

मात्र येथील तिकीट विक्रीच्या संदर्भात एक घोटाळा उघडकीस आला असून त्याबाबतची तक्रार दाखल करण्यात आली आहे.

ऑक्‍टोबर 2018 ते मार्च 2020 या काळात तिकिट विक्रीतून मिळालेली 5 कोटी 24 लाखांची रक्कम बॅंकेतून गायब झाल्याची तक्रार एचडीएफसी बॅंकेच्या वडोदरा शाखेच्या व्यवस्थापकाने पोलिसांत दाखल केली आहे.

केवडीया पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या या तक्रारीनंतर आता येथील तिकिट विक्रीच्या अनुशंगाने झालेल्या सर्व देवाण घेवाणीच्या व्यवहारांची चौकशी सुरू करण्यात आली आहे. 

पोलीस उपाधीक्षक वाणी दूधत यांनी दिलेल्या माहितीनुसार स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या नावाने येथील बॅंकेत दोन खाती आहेत. बॅंकेने डोअर स्टेप कॅश कलेक्‍शनसाठी रायटर बिझनेस नावाच्या एका एजन्सिची सेवा घेतली आहे.

मात्र या कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी वर नमूद केलेल्या कालावधीतील तिकिट विक्रीतून मिळालेली 5,24,77, 375 एवढी रक्कम बॅंकेच्या खात्यात जमाच केलेली नाही.

करोनामुळे झालेल्या लॉकडाउनच्या अगोदर स्टॅच्यू ऑफ युनिटी येथे विविध पर्यटक योजनांच्या अंतर्गत प्रवेशासाठी ऑफलाइन काउंटर सुरू करण्यात आले होते. पार्कींगसाठीही वेगळे शुल्क आकारले जात होते.

या विविध काउंटरवरची रक्कम जमा केली जात होती व संबंधित कंपनीच्या मार्फत ती बॅंकेत जमा केली जात होती. मात्र तब्बल सव्वापाच कोटींच्या आसपासची ही रक्कम जमाच झाली नसून आता काही कर्मचाऱ्यांची चौकशी केली जात आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.