उलाढाल ठप्प : वाहन वितरकांच्या अडचणी वाढल्या
पुणे – बीएस -4 वाहनांची विक्री 31 मार्चच्या अगोदर करण्यासाठी वाहन वितरक धावपळ करत होते. आता त्यासाठी केवळ 2 आठवडे शिल्ल्क आहेत. मात्र, या महिन्यात करोना प्रादुर्भावामुळे विक्रीवर बराच परिणाम झाला आहे. वितरकाकडे बीएस-4 वाहने मोठ्या प्रमाणात पडून असल्यामुळे त्यांनी चिंता वाढली आहे.
सर्वोच्च न्यायालयाने दि. 1 एप्रिलनंतर बीएस 4 प्रकाराच्या वाहनाची नोंदणी आणि विक्री करता येणार नसल्याचे सांगितले आहे. मात्र, सध्याची परिस्थिती पाहता या मुदतीला 2 महिने मुदतवाढ मिळण्याची गरज आहे, असे वाहन वितरकांची संघटना असलेल्या “एसएडीए’ने म्हटले आहे. त्यासाठी या संघटनेने सर्वोच्च न्यायालयात पुन्हा याचिका दाखल केली आहे. त्यात बीएस-4 प्रकारची वाहने 31 मे 2020 पर्यंत विकण्याची परवानगी मिळावी, असे म्हटले आहे. तसेच 31 मार्च जवळ येत असल्यामुळे या याचिकेवर लवकर सुनावणी व्हावी, अशी विनंती आम्ही न्यायालयाला केल्याचे संघटनेचे अध्यक्ष हंसराज काळे यांनी सांगितले.
सध्या वितरकांकडे 4,600 कोटी रुपयांची 8 लाख 35 हजार इतकी बीएस -4 प्रकारातील दुचाकी वाहने विक्रीविना पडून आहेत. त्या तुलनेत प्रवासी आणि व्यावसायिक वाहनांची परिस्थिती थोडी बरी आहे. अशाच प्रकारची याचिका एफएडीएने यापूर्वी दाखल केली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाने ती याचिका 14 फेब्रुवारी रोजी फेटाळली होती. मात्र, नंतर व्हायरसमुळे परिस्थितीमध्ये मोठा बदल झालेला आहे. याचा विचार करून न्यायालयाने मुदतवाढ द्यावी अशी याचिका पुन्हा दाखल केली असल्याचे त्यांनी सांगितले.