पुणे – करोनाच्या सावटाखाली गेल्या जवळपास तीन महिन्यांपासून शहरातील स्थानिक क्रीडा स्पर्धा होऊ शकलेल्या नाहीत. त्यामुळे ऑनलाइन प्रशिक्षण व मार्गदर्शन केले जात होते. लॉकडाऊनमध्ये सवलत मिळाल्याने आयोजिलेल्या टेनिस व्हॉलीबॉल कार्यशाळेला चांगला प्रतिसाद मिळाला.
महाराष्ट्र टेनिस व्हॉलीबॉल संघटनेने ही कार्यशाळा आयोजित केली होती. त्यात खेळाडू, संघटक तसेच प्रशिक्षकदेखील मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या खेळाचे जनक मानले जात असलेले डॉ. व्यंकटेश वांगवाड यांनी पुढाकार घेतला होता. या कार्यशाळेत प्रशिक्षक रणजीत चामले, आनंद खरे, गणेश माळवे, प्रफुल बनसोड, आबा शिरसाठ, मनोज म्हस्के, दशरथ देशिंगे, प्रमोद महाजन, डॉ. रितेश वांगवाड तसेच महाराष्ट्र टेबल टेनिस संघटनेचे सरचिटणीस डॉ. प्रकाश तुळपुळे आणि महाराष्ट्र राज्य क्रीडा विभागाचे सहसंचालक व राष्ट्रीय व्हॉलीबॉलपटू जे. पी. अधाने यांनी मार्गदर्शन केले.
माजी क्रीडा उपसंचालक व भारतीय टेनिस व्हॉलीबॉल संघटनेचे उपाध्यक्ष जनक टेकाळे यांनीही या कार्यशाळेला उपस्थिती लावली होती. आहार योगाचे महत्त्व महाराष्ट्राचे क्रीडा अधिकारी अरुण पाटील यांनी अवगत केले. योग प्रशिक्षक डॉ. मन्मत घरोटे यांनीही प्रात्यक्षिके सादर केली.
सरावाला हवी परवानगी..
खेळाडूंना वैयक्तिक सरावाला परवानगी देण्यात आली आहे. पुण्यातील खेळाडूंनाही अशी परवानगी मिळावी यासाठी महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेशी संपर्क साधण्यात येत असून लवकरच परवानगी मिळेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.