नवी दिल्ली : 28 डिसेंबर रोजी काँग्रेस पक्ष आपला 140 वा स्थापना दिवस साजरा करणार आहे. तत्पूर्वी पक्षाध्यक्षांकडून प्रदेश शाखांमध्ये मोठे फेरबदल केले जाण्याची शक्यता सूत्रांकडून वर्तवली जाते आहे. हरियाणा आणि महाराष्ट्रात नुकत्याच झालेल्या दणदणीत पराभवानंतर काँग्रेस आपली संघटनात्मक बांधणी मजबूत करण्यासाठी नवीन पावले उचलण्याच्या विचारात आहे.
या बदलांनुसार, अनेक प्रदेश समिती विसर्जित केल्या जाऊ शकतात आणि नवीन नियुक्त्या केल्या जाऊ शकतात, जेणेकरून आगामी निवडणुकांसाठी पक्षाची तयारी सुधारता येईल. केंद्र आणि राज्य पातळीवर पक्षाच्या रणनीतींना नवे आकार देण्यासाठी हे पाऊल उचलले जाऊ शकते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 28 डिसेंबरपूर्वी उत्तर प्रदेशप्रमाणेच इतर अनेक राज्यांतील समित्या विसर्जित करून नवीन नेतृत्वाची नियुक्ती केली जाऊ शकते.
या बदलांमध्ये महाराष्ट्रासह इतर राज्यांचे प्रभारी, प्रदेशाध्यक्ष आणि अनेक समित्या बरखास्त करून नव्या नियुक्त्या होऊ शकतात. पक्षाची संघटनात्मक ताकद वाढवण्यासाठी आणि आगामी निवडणुकीत चांगली कामगिरी करण्यासाठी हा निर्णय घेतला जाऊ शकतो.