मुंबई – एसटी कर्मचाऱ्यांना अद्याप डिसेंबर महिन्याचे वेतन न दिल्याने पुन्हा एसटी कर्मचारी संपावर जाणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. अशातच उद्या म्हणजे 14 जानेवारी रोजी कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिला. महाआघाडीचे सरकार असताना एसटी कर्मचाऱ्यांनी अनेक मागण्यांसाठी आंदोलन केले होते. प्रामुख्याने पगार वाढीची यात मागणी होती. मोठे आंदोलन करुनही त्यांच्या पदरी निराशाच आल्याचं दिसून आलं. मात्र, आता पुन्हा एकदा एसटी कर्मचारी वेतनावरून आक्रमक झाला आहे.
दरम्यान, आता राज्य सरकारने तातडीने निर्णय घेऊन एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची संक्रात गोड केल्याचं दिसून आलं आहे. कर्मचाऱ्यांचा थकलेला पगार हा आजच होणार आहे. राज्य सरकारने तातडीने 300 कोटींचा निधी रोख स्वरूपात देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही रक्कम आजच महामंडळाला देण्यात आली आहे.
एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांचे दर महिन्याला 7 तारखेला वेतन होत असते. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून आर्थिक तुटवट्यामुळे वेतन वेळेत होत झाले नाही. त्यामुळे कर्मचारी त्रस्त होते. मात्र, आता सर्व कर्मचाऱ्यांचा थकलेला पगार हा आजच होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.