नवी दिल्ली : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री जॅकलिन फर्नांडीसला दिल्लीच्या पटियाला हाऊस न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. जॅकलिनला 200 कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात दिलासा देत न्यायालयाने तिला दुबईला जाण्याची परवानगी दिली आहे. जॅकलिनने 27 जानेवारी ते 30 जानेवारी दरम्यान दुबईला जाण्यासाठी याचिका दाखल केली होती, जी मंजूर झाली आहे. पेप्सिको इंडिया कॉन्फरन्समध्ये सहभागी होण्यासाठी जॅकलिनला दुबईला जायचे असल्याचे सांगण्यात येत आहे.
जॅकलिनने दिल्ली न्यायालयात दाखल केलेल्या अर्जात, तिला दुबईतील पेप्सिको इंडिया कॉन्फरन्समध्ये सहभागी होण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. येत्या रविवारी शेड्युल कॉन्सर्टमध्ये जॅकलिनला स्टार परफॉर्ममर म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे. त्यासाठी तिने न्यायालयाकडे परवानगी मागितली होती. तिची ही मागणी न्यायालयाने मान्य केली आहे. त्यानुसार आता तिला तिच्या आगामी कार्यक्रमात सादरीकरण करता येणार आहे.
दरम्यान, जॅकलिन ही 200 कोटींच्या सुकेश चंद्रशेखर मनी लाँड्रिंग प्रकरणातील आरोपींपैकी एक आहे. 15 नोव्हेंबर 2022 रोजी जॅकलिनला नियमित जामीन मिळाला. 200 कोटी सुकेश चंद्रशेखर प्रकरणाच्या सुनावणीला पटियाला हाऊस न्यायालयाने 23 जानेवारीला स्थगिती दिली. या खटल्यातील आरोपांवर न्यायालयात चर्चा होणार होती. मात्र, न्यायालयाने सुनावणी 15 फेब्रुवारीपर्यंत पुढे ढकलली आहे. त्याचवेळी न्यायालयाने जॅकलिनला वैयक्तिक हजर राहण्यापासून सूट दिली होती. या प्रकरणाची पुढील सुनावणी 15 फेब्रुवारीला होणार आहे.