हैदराबाद : तेलंगणातील मोगलपुरा पोलिसांनी आचारसंहितेच्या कथित उल्लंघनाच्या प्रकरणात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि केंद्रीय मंत्री जी. किशन रेड्डी यांच्या विरोधात आरोपपत्र दाखल केले होते. मात्र आता त्यातून त्यांची नावे हटवण्यात आल्यामुळे या दोन नेत्यांना दिलासा मिळाला आहे. आता याच प्रकरणात अतिरिक्त महानगर मुख्य दंडाधिकाऱ्यांनी कॉंग्रेस नेते जी. निरंजन रेड्डी यांना १० तारखेला न्यायालयात हजर राहण्याची नोटीस बजावली आहे.
निरंजन रेड्डी यांनी दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारावरच अमित शहा आणि किशन रेड्डी यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. या नेत्यांनी निवडणूक आयोगाच्या आदेशांचे उल्लंघन केल्याचा आरोप त्यांनी केला होता. राजकीय पक्ष निवडणूक प्रचार सभा आणि अन्य अभियानांसाठी अल्पवयीन मुलांचा वापर करू शकत नाहीत असे आयोगाचे निर्देश आहेत.
तथापि, १ ऑक्टोबर रोजी हैदराबाद लोकसभा क्षेत्रातील शाली बांदा सुधा टॉकीज येथे आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात अल्पवीन मुलांना व्यासपीठावर बोलावण्यात आले होते. त्यावेळी भाजपचे निवडणूक चिन्ह दाखवले गेले होते, असा आरोप कॉंग्रेसने केला होता व त्याच दिवशी त्यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. अमित शहा यांच्या व्यतिरिक्त भाजपच्या अन्य नेत्यांचाही त्यांनी दाखल केलेल्या तक्रारीत समावेश होता.