घर दुरुस्तीसाठी मोठा दिलासा

परवानगीच्या जाचातून कायमची सुटका


कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीसाठी संरक्षण विभागाचा नियम

पुणे – लष्कर परिसरात राहणाऱ्या नागरिकांना घराच्या किरकोळ दुरुस्तीसाठी आता कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या परवानगीची गरज लागणार नाही. घरांच्या दुरुस्तीबाबत मार्गदर्शक सूचनांसंबधी परिपत्रक संरक्षण मंत्रालयाने बुधवारी जाहीर केले. दरम्यान, मुख्य इमारत पाडून त्याऐवजी नवीन इमारत बांधण्यासाठी परवानगी आवश्‍यक असणार असल्याचेही परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

लष्कर परिसरात जुने वाडे, घरे, इमारती मोठ्या प्रमाणात आहेत. यापैकी काही वास्तू या ब्रिटीशकालीन आहेत. कॅन्टोन्मेंट कायद्याच्या तरतुदीनुसार या परिसरात वास्तूंची दुरुस्ती, उभारणीसाठी कॅन्टोन्मेंट बोर्ड आणि संरक्षण मंत्रालय यांची परवानगी घेणे आवश्‍यक असते. मात्र, ही प्रक्रिया अत्यंत किचकट आणि वेळखाऊ असून, परवानगीसाठी बराचकाळ वाट पहावी लागते. यामुळे रहिवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. सुमित बोस यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय समितीने कॅन्टोन्मेंट बोर्डांचा नुकताच आढावा घेतला, यावेळी नागरिक आणि लोकप्रतिनिधींकडून ही समस्या उपस्थित करण्यात आली. याची दखल घेत, समितीने आपल्या अहवालात घरांच्या दुरुस्ती प्रक्रियेत बदल करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे नागरिकांना घर दुरुस्तीची कामे तातडीने करता येणार आहेत.

खालील कामांसाठी लागणार नाही परवानगी
इमारतीचेअंतर्गत विभाजन
इमारतीचा तुटलेला कोपरा, वीट अथवा दगड याची दुरुस्ती
जिन्याची दुरुस्ती
रंगकाम, प्लॅस्टर
एअर कंडिशनर, लाइटिंगसारखी कामे
खिडक्‍यांची दुरुस्ती

Leave A Reply

Your email address will not be published.