मुंबई : गेल्या दोन महिन्यांपासून राज्यात दसरा मेळाव्याचा वाद चांगलाच पेटला आहे. त्यासाठी शिवसेनेने तर चक्क न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत. मात्र या सगळ्यात मोठी बातमी समोर येत आहे. ती म्हणजे यंदा शिवतीर्थवर म्हणजेच शिवाजी पार्कवर दसरा मेळावा होणार नाही कारण. यंदा मुंबई महापालिकेने दोन्ही गटाला परवानगी नाकारली आहे.
मुंबई पालिकेनेच यासंदर्भात मोठा निर्णय घेतल्याची माहिती समोर येत आहे. मुंबई महानगर पालिकेने एकनाथ शिंदे गट आणि शिवसेना या दोन्ही बाजूंना शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी परवानगी नाकारली आहे.
कायदा आणि सुव्यवस्थेचा मुद्दा पुढे करत ही परवानगी नाकारण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. महापालिकेकडून शिवसेना आणि शिंदे गट यांना परवानगी नाकारल्याचं पत्र पाठवण्यात आल्याचेही सुत्रांकडून सांगण्यात आले आहे.
मुंबई महापालिका आयुक्त परिमंडळ 2 यांनी परवानगी नाकारल्याचं पत्र दोन्ही गटांना दिली आहे. या पार्श्वभूमवीर राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली असून आता शिवसेनेने उच्च न्यायालयात केलेल्या याचिकेच्या निर्णयाकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.