मोठी बातमी: आझाद मैदान येथे सुरू असलेले ST कर्मचाऱ्यांचे आंदोलन मागे, सदाभाऊ खोत यांची घोषणा

मुंबई – गेले 15 दिवस एस टी कामगारांचे आझाद मैदान येथे सुरू असणारे आंदोलन मागे घेण्याची घोषणा भारतीय जनता पक्षाचे नेते सदाभाऊ खोत यांनी केली. त्याचबरोबर स्थानिक पातळीवर सुरू असणाऱ्या आंदोलनाचा निर्णय तेथील एस. टी. कर्मचाऱ्यांनी घ्यावा असे त्यांनी म्हटले आहे.

बुधवारी राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांसाठी वेतनवाढ आणि वेतन हमीसंदर्भात महत्त्वाच्या घोषणा केल्यानंतर एसटी कर्मचाऱ्यांच्या भूमिकेकडे सगळ्यांचे लक्ष होते. राज्य सरकार निधी महामंडळाला वर्ग करेल. महिन्याला 10 तारखेच्या आत पगार मिळेल असं सरकारकडून सांगण्यात आले. विलिनीकरणाचा लढा सुरूच राहणार आहे. पण सरकार दोन पावले पुढे आले, ही स्वागतार्ह बाब आहे. पहिला टप्पा आम्ही जिंकलो आहोत. न्यायालयाच्या निर्णयानंतर जर आंदोलनाचा दुसरा टप्पा सुरू झाला, तर त्यात कामगारांसोबत आम्ही उभे राहू, असे खोत म्हणाले.

कर्मचाऱ्यांनी हे आंदोलन उभे केले. आम्ही आझाद मैदानात त्यांना घेऊन आलो होतो. कामगारांनी हे आंदोलन उभे केले होते. त्यामुळे त्यांनी याबाबतचा पुढचा निर्णय घ्यायचा आहे. कामगारांना न्याय मिळावा हा आमचा हेतू होता. भविष्यात वेतनवाढीसाठी आपण आंदोलन करू शकतो, असे खोत यांनी सांगितले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.