नवी दिल्ली : प्रसिद्ध पार्श्वगायक कृष्णकुमार कुन्नथ म्हणजेच ‘केके’चे कोलकाता येथे आकस्मिक निधन झाले आहे. या प्रकरणामध्ये आता कोलकाता पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यूची नोंद केली आहे. त्यामुळे आता या प्रकरणाला वेगळे वळण लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. न्यू मार्केट पोलीस स्थानकामध्ये केकेचा मृत्यू हा अनैसर्गिक कारणामुळे झाल्याची नोंद पोलिसांनी केली आहे. आज केकेच्या पार्थिवाचे शवविच्छेदन केले जाणार आहे.
गायक केकेचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे सांगण्यात येत होते, मात्र आता पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यूची नोंद केल्याने या प्रकरणासंदर्भातील तपास होण्याचीही शक्यता व्यक्त केली जात आहे. इंग्रजी वर्तमानपत्राच्या वृत्तानुसार पोलिसांच्या सुत्रांनी केकेच्या चेहऱ्यावर आणि डोक्याजवळ जखमांचे निशाण दिसून आले आहेत. आज कोलकात्यामधील एसएकेएम रुग्णालयामध्ये केकेच्या पार्थिवाचे शवविच्छेदन केले जाणार आहे. पोलीस ग्रॅण्ड हॉटेलचे सीसीटीव्ही फुटेज तपासून पाहणार आहेत. तसेच ते या हॉटेलमधील कर्मचारी आणि कार्यक्रमाच्या आयोजकांचीही चौकशी करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात येत आहे.
केके कोलकात्यामधील गुरुदास कॉलेजमधील नाझरुल मंचच्या कार्यक्रमामध्ये गात असतानच त्याला अस्वस्थ वाटू लागलं. त्यामुळे तो त्याच्या हॉटेल रुममध्ये परतला होता. तिथेच तो कोसळला आणि त्याला ततडीने रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं. त्याला कोलकात्यामधील सीएमआरआय रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्याला रुग्णालयात दाखल करण्याआधीच त्याचा मृत्यू झाला होता. डॉक्टरांनी त्याला ब्रॉट डेड म्हणजेच रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला, असे घोषित केले.
केकेने एएआर रेहमानसोबतच्या ‘कल्लुरी साले’ आणि ‘हॅलो डॉक्टर’ या गाण्यांच्या माध्यमातून संगीत क्षेत्रात पदार्पण केले होते. त्यानंतर त्याने गुलझार यांच्या माचिस चित्रपटामधील ‘छोड आऐ हम वो गलीया’ गाणं गायला. त्यानंतर त्याने कधी मागे वळून पाहिले नाही. हम दिल दे चुके सनममधील ‘तडप तडप के..’ या गाण्याने तर त्याला प्रसिध्दीच्या शिखरावर नेवून ठेवले होते.