पुणे – कोरोना महासाथीच्या पार्श्वभूमीवर बंद ठेवण्यात आलेली मैदाने पुन्हा सुरु करण्याचा महत्वपूर्ण निर्णय आज पुणे महापालिकेतर्फे घेण्यात आला. या निर्णयामुळे आता लॉक डाउनच्या पहिल्या टप्प्यापासून बंद असलेली मैदाने पुन्हा फुलणार आहेत.
आज जाहीर करण्यात आलेल्या निर्णयामध्ये महापालिकेने क्रिकेट, खो-खो आणि अन्य मैदानी खेळांना परवानगी देण्यात येत असल्याचं जाहीर केलं. मैदाने पुन्हा खुली करण्यात येणार असली तरी यामुळे कोरोना विषाणूचा प्रसार वाढणार नाही याची विशेष खबरदारी घेण्यात येणार आहे.
कोरोना विषाणू संकटाचे गांभीर्य लक्षात घेता महापालिकेने १० वर्षांखालील व ६५ वर्षांवरील नागरिकांना मैदानामध्ये प्रवेशास बंदी असणार असल्याचं स्पष्ट केलंय. यासोबतच कोरोना संबंधीच्या सर्व नियमांचे काटेकोर पालन करण्यात येणार असल्याचंही महापालिकेतर्फे सांगण्यात आलं.