मुंबई – उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेल्या गाडीचे मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणात विरोधकांकडून एन्काऊंटर स्पेशालिस्ट सचिन वाझे यांचेही नाव घेतले जात आहे. अशातच भाजप पक्षासह मनसे पक्षानेही वाझे यांच्यावरून ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.
याच पार्शभूमीवर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधानपरिषदेत आज पोलीस अधिकारी सचिन वाझे यांची बदली होणार असल्याची घोषणा केली आहे. सभागृहात अनिल देशमुख यांनी निवेदनाच्या सुरुवातीला राज्यातील क्राईम रेट सांगितलं. मात्र त्यांच्या निवेदनावेळी विरोधि पक्षाने पुन्हा एकदा गदारोळ घालत सचिन वाझेंवर काय कारवाई करणार आहे अशी विचारणा करत त्यावर बोलण्याची मागणी केली. यावेळी त्यांनी निष्पक्षपणे चौकशी करुन जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कारवाई करण्यात येईल असे म्हणत सचिन वाझे यांची बदली होणार असल्याची घोषणा केली आहे.
ते पुढे म्हणाले, ‘सचिन वाझेंवर नियमानुसार कारवाई होईल. सध्या क्राइम ब्रांच जिथे ते कामाला आहेत तिथून हलवून दुसऱ्या ठिकाणी नियुक्ती करण्यात येईल.’ मात्र या घोषणेनंतर विरोधी पक्षाकडून बदली नाही तर निलंबन करा अशी मागणी करण्यात येत आहे.