नवी मुंबई : मुंबईतील कार्डिओ क्रूझवरील ड्रग्ज पार्टीचा एनसीबीने पर्दाफाश केल्याच्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. त्यातच आता आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. नवी मुंबईतून मोठा ड्रग्जचा साठा जप्त करण्यात आला असून जप्त करण्यात आलेल्या ड्रग्जची किंमत कोट्यवधी रुपयांच्या घरात असल्याचे सांगण्यात येत आहे.
डीआरआयने नवी मुंबईतील नाव्हा शेवा बंदरावर छापेमारी करत ही कारवाई केली आहे. या प्रकरणात एका व्यक्तीला अटक देखील करण्यात आली आहे. 125 कोटींचे हेरॉईन जप्त केले असल्याचे सांगण्यात येत आहे. वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, डीआरआय मुंबईने बुधवारी न्हावा शेवा बंदरातील एका कंटेनरमधून 25 किलो हेरॉईन जप्त केले आहे. या हेरॉईनची किंमत तब्बल 125 कोटी रुपये इतकी आहे. या प्रकऱणी एका व्यावसायिकाला अटक करण्यात आली असून त्याला न्यायालयाने 11 ऑक्टोबरपर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे.
Directorate of Revenue Intelligence (DRI) Mumbai on Wednesday seized 25 Kg heroin worth Rs 125 crores from a container at Nhava Sheva Port. One business has been arrested and sent to custody till October 11: DRI Mumbai
— ANI (@ANI) October 8, 2021
तर दुसरीकडे राजगड पोलिसांनी आज पहाटे मुंबई-गोवा हायवेवर, खेड-शिवापूर टोल नाक्यावर अमली पदार्थ घेऊन जात असणाऱ्या एका आरोपीला अटक केली. अटक करण्यात आलेल्या आरोपीकडून सहा किलोंचा चरस साठा जप्त करण्यात आला आहे. या चरसची किंमत अंदाजे 24 लाख रुपये असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मुंबईहून गोवा कडे जात असणाऱ्या एक प्रवासी अमली पदार्थ घेऊन जात असल्याची राजगड पोलिसांना माहिती मिळाली.
या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक सचिन पाटील, एपीआय मनोज नवसारे यांच्या पथकाने खेड शिवापुर टोलनाक्याजवळ डॉल्फिन ट्रॅव्हल्सने जात असणाऱ्या प्रवाशांची तपासणी केली असता, मुळचा नेपाळच्या एका प्रवाशाकडे अंदाजे सहा किलो वजनाचा चोवीस लाखांचा चरस त्याच्या बॅगेमध्ये मिळून आला आहे. या प्रवाशाला राजगड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्याबरोबर अजून कोण साथीदार आहेत का, या अमली पदार्थाची कोठे-कोठे विक्री करणार होता? याचा अधिक तपास राजगड पोलीस करत आहेत.