कोल्हापूर – काही दिवसांपूर्वी (11 जानेवारी) राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांच्या घरावर ईडीने छापे टाकले होते. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील घोटाळ्याचे आरोप मुश्रिफांवर केले होते. त्यानंतर आजपर्यंत सोमय्या आणि आमदार हसन मुश्रीफ यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोप होताना दिसून येत आहेत.
अश्यातच, आज पुन्हा एकदा हसन मुश्रीफ यांच्या घरावर ईडीची धाड पडली आहे. गेल्या दीड महिन्यातील ही दुसरी धाड आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. एका प्रसिद्ध वृत्तसंस्थेने याबद्दल माहिती दिली आहे. दरम्यान, ईडीने दुसऱ्यांदा धाड मारल्याने मुश्रीफ यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता निर्माण केली जात आहे.
आज पहाटेच ईडीच्या चार ते पाच अधिकाऱ्यांनी कागलमधील हसन मुश्रीफ यांच्या घरावर धाड मारली. ईडीच्या अधिकाऱ्यांनी सकाळी सकाळीच मुश्रीफ यांच्या घरी येऊन छाननी सुरू केली आहे. ईडीकडून महत्त्वाच्या कागदपत्रांची तपासणी करण्यात येत आहे. गेल्या दीड महिन्यातील ईडीने ही दुसरी छापेमारी केल्याने हसन मुश्रीफ यांना मोठा झटका बसला असून, सगळीकडे एकच खळबळ उडाल्याचं दिसून येत आहे.
हसन मुश्रीफ यांच्या घरावर 11 जानेवारी रोजी पडली पहिली धाड !
11 जानेवारी रोजी ईडीने हसन मुश्रीफ यांच्या निवासस्थानी छापेमारी केली होती. यावेळी त्यांच्या कागलमधील घरावर तसेच पुणे येथील कार्यालयांवर यावेळी छापे टाकण्यात आले होते. तब्बल 12 तास मुश्रीफांच्या घरी छापेमारी सुरू होती.