पुणे – कसबा आणि चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपने उमेदवार जाहीर केल्यानंतर राजकीय घडामोडींना मोठा वेग आला आहे. भाजपने कसब्यातून टिळक कुटुंबियांना उमेदवारी न देता हेमंत रासने यांच्या नावाची घोषणा केली. त्यानंतर कॉंग्रेसने देखील रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी देत मैदानात उतरवले. तर, दुरीकडे भाजपाने पिंपरी चिंचवड येथील पोटनिवडणुकीसाठी दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी लक्ष्मण जगताप यांना उमेदवारी दिली आहे.
अश्यातच आता राष्ट्रवादीने देखील या जागेवर आपला अधिकृत उमेदवार जाहीर केला आहे. पक्षाने ‘नाना काटे’ यांनी उमेदवारी जाहीर केली आहे. ही जागा बिनविरोध होईल अशी स्थिती असताना राष्ट्रवादीने अखेरच्या क्षणी नाना काटे यांना उमेदवारी देऊन ही निवडणुक बिनविरोध केली नाही. ही उमेदवारी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जंयत पाटील यांनी जाहीर केली आहे. त्यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे.
चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडी तर्फे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे श्री. नाना काटे हे उमेदवार असतील.
महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षातील कार्यकर्ते व पदाधिकारी एकत्र काम करून या निवडणुकीत आम्ही नक्कीच विजयी होऊ, असा आम्हाला विश्वास आहे.@OfficeofUT @NANA_PATOLE
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) February 7, 2023
दरम्यान, सोमवारी दिवंगत लक्ष्मण जगताप पत्नी अश्विनी जगताप यांनी त्यांच्या निवासस्थानापासून पदयात्रेद्वारे शक्ती प्रदर्शन करत चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी थेरगाव येथील ‘ग’ क्षेत्रीय कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल केला. तर, आज राष्ट्रवादीचे नाना काटे हे अजित पवारांच्या उपस्थितीत आपला अर्ज भरणार आहेत.