मुंबई : भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, नागपुर येथील त्यांच्या कार्यलायत धमकीचे दोनवेळा फोन आले आहेत. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या नावे नितीन गडकरींना धमकी देण्यात आली आहे.
एवढेच नाही तर फोन करणाऱ्या व्यक्तीने धमकी देत दोन कोटी रुपयांची खंडणी मागितली असल्याचेही सांगण्यात येत आहे. दरम्यान, या प्रकरणी पोलीस सतर्क झाले असून हा फोन कॉल नेमके कुणी केले,यासंदर्भात पोलिसांचा तपास सुरू आहे.
मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपूर येथील जनसंपर्क कार्यालयाच्या बाहेर चार संपर्क क्रमांक लावण्यात आले आहेत. या नंबर्सवर सकाळपासून तीन वेळा फोन आले आहेत.
या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तपास सुरु केला आहे. स्थानिक पोलिसांसह अँटी टेररिझम स्क्वाड अर्थात एटीएसची टीमदेखील नागपुरात दाखल झाली आहे.