मोठी बातमी! काळजी घ्या, महाराष्ट्रात ‘लस’ आणि ‘रेमडेसिवीर’चा तुटवडा, लसीकरण केंद्र ‘बंद’

पुणे – राज्यात नवीन करोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. काल (ता. 07 एप्रिल) राज्यात 59907 नवीन करोनाबाधितांची भर पडली आहे. त्यामुळे एकूण अॅक्टिवह् रुग्णांची संख्या आता 5 लाखावर जाऊन पोहोचली आहे. अशा परिस्थितीत लस आणि रेमडेसिवीर इन्जेक्शनची अत्यंत आवश्यकता आहे. मात्र राज्यात सध्या या दोन्हींचा तुटवडा आहे.

लसीचा मोठा तुडवडा निर्माण झाल्याने लसीकरण केंद्र बंद ठेवण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, पनवेल यांसह अनेक शहरातील लसीकरण केंद्र बंद करण्यात आली आहेत. मुंबई, नागपूर, पुणे शहर, सोलापूर येथेही दोन दिवस पुरेल एवढाच साठा शिल्लक राहिलेला आहे. राज्य सरकारने केंद्राकडे लसीच्या पुरवठ्याची मागणी केली आहे. मात्र सध्यातरी तुटवडा असल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

तसेच करोनाच्या उपचारात महत्वपूर्ण असलेल्या रेमडेसिवीर या इंजेक्शनचाही तुटवडा भासत आहे. अनेक रुग्णांच्या नातेवाईकांवर रेमडेसिवीर इंजेक्शनसाठी दारोदार भटकत फिरण्याची वेळ आलीय. रेमडेसिवीर मिळत नसल्याने आपल्या रुग्णाचं काय होणार या विषयावर अनेकांच्या डोळ्यात पाणी येत आहे. अशी परिस्थिती असताना एकिकडे रेमडेसिवीरचा काळा बाजार होत असल्याचे समोर येत आहे. काही ठिकाणी कारवाई देखील करण्यात आली आहे. लवकरच रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध केले जातील असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले आहे.

“ताज्या रिलीज ऑर्डरनुसार, राज्याला एका आठवड्यासाठी फक्त ७.५ लाख लसीचे डोस दिले आहेत. उत्तर प्रदेश ४८ लाख, मध्य प्रदेश ४० लाख, गुजरातला ३० लाख, हरियाणाला २४ लाख अशा पद्धतीने लसींचं वाटप झालं आहे. या ऑर्डरला घेऊन मी तातडीने डॉ. हर्ष वर्धन यांच्याशी बोललो. त्यांनी मला अधिकाऱ्यांना सूचना देऊन तातडीने दुरुस्त्या करण्याचं आश्वासन दिलं आहे. आम्ही त्या दुरुस्त्या होण्याची वाट पाहात आहोत”, असं राजेश टोपे म्हणाले आहेत.

दरम्यान, लस आणि रेमडेसिवीरचा तुटवडा भासत आहे. त्यामुळे नागरिकांनी आपल्या आरोग्याची जास्त काळजी घेणे आवश्यक आहे. बाहेर जाताना मास्कचा वापर करणे, सॅनिटायझरचा वापर करणे, सुरक्षित अंतर ठेवणे इत्यादी नियमांचे काटेकोरपणे पालन करायला हवे. प्रत्येकाने सुरक्षितता ठेवली तर नक्कीच हा संसर्ग कमी होऊ शकतो. असे तज्ज्ञांकडून सांगण्यात आले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.