मोठी बातमी : महाराष्ट्राला दोन दिवसांत मिळणार लसीचे साडे 19 लाख डोज

गिरीष बापट यांनी घेतली आरोग्य मंत्र्यांची भेट

नवी दिल्ली (वंदना बर्वे) – महाराष्ट्राला कोविड लसीचे 19 लाख 50 हजार  पुढील दोन दिवसांत मिळणार आहे, अशी माहिती भाजपचे खासदार गिरीष बापट यांनी दिली. मात्र, महाराष्ट्र सरकारने राजकारण न करता लसीचा योग्य वापर करावा, अशी ताकीदही त्यांनी यावेळी दिली.

पुण्याहून भाजपचे खासदार गिरीष बापट यांनी आज केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांची भेट घेतली. यानंतर नवीन महाराष्ट्र सदनात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महाराष्ट्राला किमान आठवडाभर पुरेल एवढा साठा उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती.

गिरीष बापट म्हणाले, पुण्यात बुधवारी सुमारे साडेदहा हजार कोविडचे रुग्ण सापडले. ही संख्या चिंताजनक असून, महाराष्ट्रातील आजची सर्वाधिक रुग्णसंख्या आहे. या पार्श्‍वभूमीवर केंद्र सरकारने प्रतिबंधक लस देण्याची मोहीम अधिक गतिमान करावी. तसेच रुग्णालयातील बेडसची संख्या वाढवण्यासाठी मदत करावी, असे निवेदन त्यांनी केंद्रीय आरोग्य मंत्री यांना दिले.

दरम्यान, महाराष्ट्रातील उध्दव ठाकरे यांच्या सरकारने आपले अपयश लपविण्यासाठी केंद्र सरकारवर चुकीचे आरोप करू नये. केंद्राकडून लवकरच 19 लाख 50 हजार लसीचा पुरवठा केला जाणार आहे. महाराष्ट्र सरकारने या लसीचा वापर योग्यरितीने करावा. करोनाचा काळ हा राजकारण करण्यासाठी नाही. सर्वांनी एकत्रित प्रयत्न करून मुकाबला केला पाहिजे. आम्ही सरकारला सहकार्य करीत आहोत. पण लोकांचे लक्ष वाझे प्रकरणावरून वळविण्यासाठी त्यांचा प्रयत्न सुरू आहे, असे ते म्हणाले.

बापट म्हणाले, पुण्यात सरासरी दररोज पंचवीस हजार नागरिक लस टोचून घेतात. मात्र, शहराला दर आठवड्याला सुमारे दोन लाख लसीची गरज आहे. लशीचा पुरवठा कमी झाल्याने या मोहिमेवर परिणाम झाला आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील खासगी रुग्णालयांना लस देण्याची परवानगी द्यावी. अशी आमची मागणी आहे. याबाबतचा प्रस्ताव केंद्राकडे यापूर्वीच पाठविण्यात आला आहे.

शहरातील 215 खासगी रुग्णालयात लसीकरण करता येईल. त्या रुग्णालयाची यादीही आम्ही सादर केली आहे. तसेच दुर्धर आजाराने ग्रस्त व अंथरुणाला खिळून असलेल्या वृद्ध नागरिकांसाठी मोबाईल लसीकरण व्हॅन सुरू करण्याची परवानगी पुणे महापालिकेला देण्यात यावी. याकडे आरोग्य मंत्र्यांचे लक्ष वेधले आहे. कोविड लसीकरणासाठी खाजगी रूग्णालयांना परवानगी मिळवणे ही प्रक्रिया अतिशय क्‍लिष्ट आहे. ती सुलभ करून लसीकरणाचे प्रमाण वाढवावे. तसेच व्हेंटिलेटरची संख्या वाढवावी यासाठी मी केंद्राकडे आग्रह धरला आहे, असे बापट म्हणाले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.