मुंबई : रविवारी देशभरात 71 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. खेळाडू, कलाकार, राजकीय नेते, पक्ष आणि विविध मान्यवरांनी देशवासीयांना सोशल मीडियावरून प्रजास्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. मात्र, प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देताना राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाकडून मोठी चूक झाल्याचे समोर आले आहे.
प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून फेसबुक, ट्विटरवर आणि इतर सोशल मीडियावरून देशवासीयांना शुभेच्छा दिल्या. मात्र, शुभेच्छा देताना राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आलेल्या छायाचित्रामध्ये देशाचा चुकीचा नकाशा वापरण्यात आला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून देशाच्या अधिकृत नकाशा ऐवजी चुकीचा नकाशा प्रसिद्ध झाला आहे. यामध्ये जम्मू काश्मीर आणि लडाखची सीमारेषा चुकली असून, पाकव्याप्त काश्मीर तसेच अक्साई चीन हे भाग दाखवण्यात आले नाहीत.
राष्ट्रवादीने प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देताना भारताचा नकाशा पोस्ट केला आहे. ज्यात खांद्यावर तिरंगा घेऊन साहसी कौशल्य दाखवणाऱ्या जवानांचा फोटो आहे. लोकशाहीचा उद्घोष करणारे भारतीय प्रजासत्ताक चिरायू होवो ! सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ! असे कॅप्शन देण्यात आले आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसनं चुकीचा नकाशा पोस्ट केल्याचं समजल्यानंतर नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. त्वरित चुकीचा नकाशा हटवावा असे काही नेटकऱ्यांनी म्हटले, तर एकाने थेट तक्रार दाखल करायचे का? असेही म्हटले आहे.