टोमॅटोच्या किमतीत मोठी वाढ

नवी दिल्ली – कोळशाच्या तुटवड्यामुळे सर्वसामान्य ग्राहकाबरोबरच औद्योगिक उत्पादनावर परिणाम होण्याची शक्‍यता निर्माण झाली असतानाच देशातील मोठ्या शहरांमध्ये टोमॅटोच्या किमतीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असल्याचे दिसून येत आहे.

टोमॅटो हे नाशवंत पीक असल्यामुळे आयात करून ही तूट भागवणे अवघड झाले असल्याचे दिसून येत आहे. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या राज्यात टोमॅटोचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. मात्र या दोन राज्यांमध्ये गेल्या महिन्यामध्ये अनेक वेळा अवकाळी पाऊस झाल्यामुळे टोमॅटोच्या उत्पादनाबरोबरच वाहतुकीवर परिणाम झाला असल्यामुळे टोमॅटोचे दर वाढले असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

बऱ्याच शहरांमध्ये आता टोमॅटोचे दर 72 रुपये प्रति किलो या पातळीवर गेले आहेत. गेल्या वर्षी या काळात टोमॅटोचे दर केवळ 38 रुपये प्रति किलो होते. दिल्ली, चेन्नई, मुंबई या विविध शहरांमध्ये टोमॅटोचे दर वाढले असल्याचे दिसून येते. आजादपुर मंडीमधून दिल्लीत मोठ्या प्रमाणात टोमॅटोचा पुरवठा केला जातो.

या मंडीतील टोमॅटोची आवक कमी झाली आहे. त्यामुळे दिल्लीमध्ये टोमॅटोचे दर सध्या उच्च पातळीवर गेले आहेत. हिमाचलमध्येही टोमॅटोचे उत्पादन होते. मात्र तेथेही पावसामुळे टोमॅटोच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. साधारणपणे 60 टक्के उत्पोदनावर परिणाम झाला असल्याचे त्यांनी सांगितले.

संघटनेचे अध्यक्ष अशोक कौशिक यांनी सांगितले की, या ठिकाणी साधारणपणे 600 टन टोमॅटोची आवक होत असते. मात्र सध्या अडीचशे ते तीनशे टन टोमॅटो येत आहे. त्यामुळे दरामध्ये दुपटीने वाढ झाली असल्याचे त्यांनी सांगितले.

चीन नंतर टोमॅटो उत्पादन करणारा भारत हा जगातील सर्वात मोठा देश आहे. भारतामध्ये साधारणपणे 7.89 लाख हेक्‍टर जमिनीवर वर्षाला 19.75 दशलक्ष टन टोमॅटोचे उत्पादन घेतले जाते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Comments are closed.