नवी दिल्ली – जागतिक बाजारात सोन्याचे दर वाढत असल्यामुळे भारतीय बाजारातही आज सोन्याचे व चांदीचे दर वाढले. दिल्ली सराफात सोन्याचे दर ( gold price today ) 816 रुपयांनी वाढून 49,430 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले. दिल्ली सराफात तयार ( Silver price today ) चांदीचे दर 3063 रुपयांनी वाढवून 64,361 रुपये प्रति किलो झाले.
आजच्या या दरवाढीबद्दल बोलताना मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेसचे संशोधन प्रमुख नवनीत दमानी यांनी सांगितले की, युरोप आणि अमेरिकेतील करोना रुग्ण वाढत असल्यामुळे गुंतवणूकदार काही प्रमाणात सोने खरेदी करून ठेवत असल्यामुळे सोन्याचे दर वाढत आहेत.
दागिने निर्यात विक्रमी होणार
दरम्यान, लॉक डाऊनच्या काळातही भारतात दागिन्यांची निर्यात ( Jewelry export ) बरीच वाढली आहे. आता परिस्थिती आणखी सुधारली असून या वर्षाच्या अखेरीस दागिने क्षेत्रातून 1.6 लाख कोटी रुपयाची निर्यात होईल असे दागिने उत्पादकांच्या संघटनेने म्हटले आहे.
लॉक डाउनच्या काळात केंद्र सरकारने दागिन्याच्या निर्यातीवर परिणाम होणार नाही यासाठी बऱ्याच उपायोजना केल्या आहेत. केंद्र सरकारने लघुउद्योगांना दिलेल्या सवलतीचा दागिने उत्पादकांनाही लाभ झाला आहे. त्यामुळे परिस्थिती पूर्ववत होण्यास कमी कालावधी लागेल, असे ज्वेलरी एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिल ऑफ इंडिया या संघटनेने म्हटले आहे.
लॉक डाऊनच्या काळात काही कामगार आपल्या गावी परत गेले होते. आता ते कामगार परतले आहेत. त्यामुळे उत्पादन प्रक्रिया पूर्ववत झाली आहे. दागिने उत्पादनासाठी एसईझेड सारखी यंत्रणा राबविण्याची गरज आहे. केंद्र सरकार अर्थसंकल्पात यासाठी 200 कोटी रुपयांची तरतूद करेल अशी आम्हाला अपेक्षा आहे. आम्ही तशा असल्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे दाखल केला आहे.