मुंबई – अभिनेत्री राणी मुखर्जी हिच्या ‘मेहंदी’ या चित्रपटातून तिच्या पतीच्या भूमिकेत झळकलेल्या अभिनेता ‘फराज खान’ सध्या मृत्यूशी झुंज देत आहे. बंगळुरू येथील एका रुग्णालयात फराज वर उपचार सुरु आहेत. ब्रेन इन्फेक्शननंतर त्याला अतिदक्षता विभागात ठेवण्यात आल्याचं कळत आहे.
दरम्यान, एकीकडे फराजची मृत्यूशी झुंज सुरु असताना बॉलिवूडचा भाईजान म्हणजेच, अभिनेता सलमान खान त्याच्या मदतीला धावला आहे. दिलखुलास अंदाजासाठी आणि गरजूंना वेळोवेळी मदत करण्यासाठी सलमानला ओळखले जाते. सलमान फराज खानच्या संपूर्ण हॉस्पिटल आणि ट्रिटमेंटचा खर्च करणार आहे.
अभिनेत्री कश्मीरा शाह हिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत याबद्दल माहिती दिली आहे. तसेच काही दिवसांपूर्वी अभिनेत्री पूजा भट्ट हिने फराज खान याच्या प्रकृतीबद्दल माहिती देताना मदतीची मागणी केली होती. त्यानंतर आता सलमानने मदतीचा हात पुढे केल्याचे दिसून आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर मुळे त्रस्त असलेला फराज खान याच्यावर बंगळुरु येथील एका हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. फराज खान याची प्रकृती गंभीर असून उपचारासाठी त्याचा छोटा भाऊ फहमान खान पैसे जमा करत आहे.