मोठी पडझड ! भांडवली बाजार हजार अंकांनी गडगडला; आंतरराष्ट्रीय बाजाराचे परिणाम

मुंबई : भारतीय शेअर बाजाराची आजची सकाळ मोठ्या प्रमाणात पडझडीने सुरुवात झाली. शेअर बाजाराचे व्यवहार सकाळी सुरु झाल्या झाल्या एक हजारांहून अधिक अंकाची पडझड झाल्याचे चित्र पहायला मिळाले. जागतिक बारपेठेमधील घसरण या पडझडीला कारणीभूत असल्याचे सांगण्यात येत आहे.

सकाळी ९ वाजून १८ मिनिटांनी शेअर बाजार सुरु झाला तेव्हा बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमधील सेन्सेक्स ५० हजार १८४.६० वर होता. काल बाजार बंद झाला तेव्हा सेन्सेक्स ५१ हजारांवर होता. दुसरीकडे नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा निफ्टी हा निर्देशांकही २८३.४५ अंकांनी घसरला आणि १४.८३५.४५ वर स्थिरावला. कालच्या तुलनेत सेन्सेक्समध्ये १.६८ टक्के तर निफ्टीमध्ये १.८७ टक्क्यांची घसरण पहायला मिळाली. सकाळच्या सत्रात सेन्सेक्स एक हजार अंकांनी घसरला होता.

आज राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयकडून भारताच्या जीडीपीसंदर्भातील आकडेवारी जाहीर केली जाणार आहे. तिसऱ्या तिमाहीमध्ये म्हणजेच ऑक्टोबर ते डिसेंबर २०२०-२१ मध्ये जीडीपीची किती वाढ झाली यासंदर्भातील आकडेवारी आज जाहीर होणार असल्याने त्यावरही बाजारामधील चढ उतार अवलंबून असेल. मागील दोन तिमाहींमध्ये अर्थव्यवस्थेच्या वाढीवर अत्यंत प्रतिकूल परिणाम झाला होता.मात्र अनलॉक झाल्यानंतर म्हणजे ऑक्टोबर ते डिसेंबर या तिमाहीत जीडीपीची वाढ आधीच्या दोन तिमाहीपेक्षा चांगली असेल अशी अपेक्षा आहे. अर्थात शेअर बाजारावर जागतिक अर्थव्यवस्थेचे पडसादही दिसून येत असल्यामुळे पडझड झाल्याचे सांगितले जात आहे. आशियामधील सर्वच शेअर बाजारांमध्ये पहिल्या सत्रामध्ये घसरण पहायला मिळाली आहे. यामुळे गुंतवणुकदारांचे मोठं नुकसान झाल्याचं सांगण्यात येत आहे.

अमेरिकेतील वॉल स्ट्रीटमध्ये घसरण झाल्याने आशियामधील जवळजवळ सर्वच शेअर बाजारांमध्ये आज नकारात्मक सुरुवात झाल्याचे पहायला मिळालं. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअर्सचे भाव गडगडल्याचे चित्र दिसलं. ऑस्ट्रेलियातही शेअर बाजाराचा निर्देशांक दोन टक्क्यांनी घसरला. जानेवारी २८ नंतरची ऑस्ट्रेलियन शेअर बाजारातील ही सर्वात मोठी घसरण आहे. जपानचा शेअर बाजार १.८ टक्क्यांनी गडगडला तर हाँगकाँगच्या शेअर बाजारामध्येही १.६९ टक्क्यांची घसरण पहायला मिळाली. अमेरिकेतील वॉल स्ट्रीटवरील नॅसडॅकमध्ये गुरुवारी मोठी घसरण झाली. नॅसडॅकमधील मागील चार महिन्यातील एका दिवसातली सर्वात मोठी घसरण गुरुवारी पहायला मिळाली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.