भोपाळ – भारतीय जनता पार्टी घराणेशाहीच्या मुद्द्यावरून कॉंग्रेसवर कायम टीका करतो. मात्र घराणेशाहीचे हे लोन भाजपमध्येही पूरेपुर भिनले असल्याचे मध्य प्रदेशातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सिध्द झाले आहे. या निवडणुकांमध्ये मंत्री, आमदार, खासदारांच्या नातलगांना भरपूर तिकीटे देण्यात आली.
यातील काही जण विजयी झाले तर काही जणांना पराभवाचा सामना करावा लागला. विशेष म्हणजे निवडणुकीच्या अगोदर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा स्वत: मध्य प्रदेशात आले होते. घराणेशाहीवरून त्यांनी नेहमीप्रमाणे कॉंग्रेसला लक्ष्य केले होते. मात्र त्यांच्या स्वत:च्याच पक्षाच्या नेत्यांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केल्याचे समोर आले आहे.
अगोदर झालेल्या पत्रकार परिषदेत नड्डा यांनी घराणेशाहीची व्याख्या समजावली होती. ते म्हणाले होते की पित्यानंतर पुत्राला उमेदवारी दिली जाण्याचे प्रकार आपण रोखले पाहिजे. मध्य प्रदेशच्या नगरपालिका निवडणुकांतही हा नियम लागू होतो. येथे 2-3 निवडणुका झाल्या. आपण जिंकू शकलो असतो. मात्र ते म्हणतात, जागा अडचणीत सापडेल, आपण पराभूत होऊ…मात्र धोरण असे आहे की बऱ्याच वेळा ऑपरेशन करावे लागते. पक्षातील लोकशाही कायम ठेवायची आहे की नाही, असा सवालही त्यांनी त्यावेळी उपस्थित केला होता.
आपल्या म्हणण्याच्या पुष्टीसाठी नड्डा म्हणाले होते की हिमाचल प्रदेशात आम्ही पराभूत झालो. मात्र कार्यकर्त्याला उमेदवारी दिली. जेव्हा लोकप्रतिनिधीत्वाचा सवाल आहे तेथे धोरणानुसार आम्ही कार्यकर्त्याला पुढे आणू. त्रास होतो पण पक्षाला पुढे न्यायचे असेल आणि अंतर्गत लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर कार्यकर्त्याला उमेदवारी दिली पाहिजे. नाहीतर पुढे तुमच्या पक्षात कोण येईल असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता. नड्डा यांनी एवढी स्पष्ट भूमिका मांडल्यानंतरही मध्य प्रदेशात त्याचे पालन झाल्याचे दिसून आले नाही.