नवी दिल्ली : देशातील कोरोनाला थोपवण्यासाठी केंद्राने १ मेपासून १८ वर्षांवरील सर्वांचे लसीकरण करण्यास परवानगी दिली आहे. दरम्यान, उत्तर प्रदेश सरकारने याच लसीकरण मोहिमेसाठी मोठा निर्णय घेतला आहे. १८ वर्षांवरील सर्वांचे मोफत लसीकरण करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ करोना पॉझिटिव्ह आढळले असून सध्या विलगीकरणात आहेत. उत्तर प्रदेशात वीकेण्ड लॉकडाउनची घोषणा करण्यात आली आहे. शुक्रवारी रात्री ८ वाजल्यापासून ते सोमवारी सकाळी ७ वाजेपर्यंत हा लॉकडाउन असेल. तसेच नाईट कर्फ्यू जाहीर करण्यात आलेला असून अत्यावश्यक सेवा वगळता इतर गोष्टींना परवानगी नाही.
प्यारे प्रदेशवासियों,
आज मंत्रिपरिषद की बैठक में यह निर्णय लिया गया है कि उत्तर प्रदेश में 18 वर्ष से अधिक आयु के सभी प्रदेशवासियों का कोरोना टीकाकरण @UPGovt द्वारा निःशुल्क कराया जाएगा।
कोरोना हारेगा, भारत जीतेगा…
— Yogi Adityanath (@myogiadityanath) April 20, 2021
योगी आदित्यनाथ यांनी ट्विट करत दिलेल्या माहितीनुसार, “मंत्रिमंडळ बैठकीत उत्तर प्रदेशातील १८ वर्षाच्या पुढील सर्वांना करोना लस मोफत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. करोनाचा पराभव होईल आणि भारत जिंकेल”.
योगी आदित्यनाथ यांनी लसीकरण केंद्रांची संख्या वाढवण्याचा तसंच वयोगटाप्रमाणे डेटा तयार करण्याचा आदेश दिला आहे. सर्वाधिक लोकसंख्या असणाऱ्या उत्तर प्रदेशात आरोग्य यंत्रणेसमोर हे मोठं आव्हान असणार आहे. याशिवाय आसामनेही मोफत लसीकरणाची घोषणा केली आहे. राज्याच्या आरोग्यमंत्र्यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे. सध्याच्या घडीला ४५ वर्षांवरील नागरिक लसीकरणासाठी पात्र आहेत.