मोठा निर्णय! राहुल गांधींनी केल्या पश्चिम बंगालमधील सर्व सभा रद्द

नवी दिल्ली : देशात करोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्याच पार्श्वभूमीवर काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी सर्वात मोठा निर्णय घेतला आहे. पश्चिम बंगाल निवडणुकीच्या निमित्ताने सध्या जोरदार प्रचार सुरु आहे. राहुल गांधी यांनी आपल्या सर्व सभा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. राहुल गांधी यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे.

देशात गेल्या २४ तासांत २ लाख ६१ हजार ५०० करोनाबाधित आढळले असून राहुल गांधी यांनी सर्व राजकीय नेत्यांना अशा परिस्थितीत गर्दी करत प्रचारसभा घेण्यासंबंधी विचार कऱण्याचं आवाहन केलं आहे. पश्चिम बंगालमध्ये शनिवारी पाचव्या टप्प्यातील मतदान पार पडलं. पाचव्या टप्प्यात एकूण ७९.१८ टक्के मतदानाची नोंद झाली. यानंतर राहुल गांधी यांनी करोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता महत्वाचा निर्णय घेतला आहे.

राहुल गांधी यांनी ट्विट करत सांगितलं आहे की, “करोनाची स्थिती लक्षात घेता मी पश्चिम बंगालमधील माझ्या सर्व प्रचारसभा रद्द करत आहे. मी सर्व राजकीय नेत्यांना सल्ला देऊ इच्छितो की, त्यांनी सध्याच्या परिस्थितीत मोठ्या गर्दीत सभा घेण्याच्या परिणामांचा गांभीर्याने विचार करावा”.

काँग्रेस पक्ष आणि राहुल गांधींनी वारंवार भाजपा नेत्यांवर मोठ्या प्रमाणात गर्दी करुन सभा घेण्यावरुन टीकास्र सोडलं होतं. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही टीका करण्यात आली होती. मात्र यावेळी काँग्रेसचे नेतेही सभा घेत होते. दरम्यान राहुल गांधी यांनी सर्व सभा रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर इतर काँग्रेस नेत्यांकडून स्वागत करण्यात येत असून सर्वांसमोर एक उदाहरण ठेवत असल्याचं म्हटलं आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.