नवी दिल्ली – गेल्या काही दिवसांपासून करोना रुग्णसंख्या पुन्हा एकदा वाढू लागल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. अशातच आज केंद्र सरकारने दिलासादायक माहिती दिली आहे. देशात १ मार्चपासून ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांचे सरकारी लसीकरण केंद्रांमध्ये मोफत लसीकरण करण्यात येणार आहे. याबरोबरच इतर व्याधी असलेल्या ४५ वर्षांवरील नागरिकांचे देखील लसीकरण करण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली.
याबाबत बोलताना जावडेकर यांनी, “देशात १ मार्चपासून ६० वर्षांवरील व ४५ वर्षांवरील इतर व्याधी असलेल्या नागरिकांचे लसीकरण होणार आहे. लसीकरणासाठी देशातील १० हजार सरकारी व २० हजार खासगी लसीकरण केंद्र सज्ज आहेत. सरकारी केंद्रांवर लसीकरण मोफत करण्यात येईल.” अशी माहिती दिली.
खासगी लसीकरण केंद्रांवर लसीकरणासाठी किती पैसे मोजावे लागणार?
लसीकरणाच्या या टप्प्यामध्ये ६० वर्षांवरील व ४५ वर्षांवरील इतर व्याधी असलेल्या सामान्य नागरिकांना लस घेता येणार आहे. तसेच या टप्प्यात २० हजार खासगी लसीकरण केंद्र असणार असल्याचं जावडेकर यांनी सांगितलं आहे. या केंद्रांवर लसीकरणासाठी किती किंमत आकारली जावी याबाबतचा निर्णय उत्पादक आणि रुग्णालयांशी चर्चा केल्यानंतर सरकार येत्या ३ ते ४ दिवसांमध्ये घेईल असंही जावडेकर यांनी सांगितलं.
तत्पूर्वी, करोना लसीकरणाच्या पाहिल्या टप्प्यामध्ये आरोग्यकर्मी व फ्रंटलाईन वर्कर्सचे लसीकरण करण्यात येत आहे.
Those who want to get vaccinated from private hospitals will have to pay. The amount they would need to pay will be decided by the health ministry within 3-4 days as they are in discussion with manufacturers & hospitals: Union Minister Prakash Javadekar pic.twitter.com/Vi0V37oOJL
— ANI (@ANI) February 24, 2021