नवी दिल्ली : जगभरात करोनामुळे मंदीचे सावट सर्वच देशांवर उमटत असल्याचे दिसून येत आहे. रोजगाराचा मुद्दा गंभीर होत असल्याचेही समोर येत आहे. त्यातच एकीकडे जेट एअरवेज पुन्हा सुरु करण्याची योजना असताना या कंपनीच्या बऱ्याच कर्मचाऱ्यांच्या पगारात कपात करण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे. तर दुसरीकडे काही कर्मचाऱ्याना बिनपगारी रजेवर पाठवण्यात आले आहे. कंपनीचे सीईओ संजीव कपूर यांनी स्वतः ट्विट करून ही माहिती दिली आहे.
1 डिसेंबरपासून या उपाययोजना करण्यात येणार आहेत. आर्थिक संकटातून मार्ग काढण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे. जेट एअर लाईन्सचे अडीचशे कर्मचारी आहेत. त्यापैकी कुणालाही नोकरीवरून काढण्यात येणार नाही. पण काही जणांना बिनपगारी सुट्टी देण्यात आलीय तर अनेकांच्या पगारात 50 टक्क्यांपर्यंत कपात करण्यात आली आहे.. 2019 मध्ये कर्जबाजारी झालेल्या जेट एअरवेजची सेवा बंद करण्यात आली. गेल्या वर्षी जेट एअरवेज पुन्हा सुरु करण्याचा निर्णय झाला आणि त्याला मान्यताही मिळाली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जेट एअरवेजच्या कर्मचाऱ्यांच्या पगारात 50 टक्के कपात करण्यात येणार आहे. सीईओ आणि सीएफओच्या पगारात जास्त कपात करण्यात येणार आहे. काही कर्मचाऱ्यांच्या वेतनात तात्पुरती कपात तसेच काहींना बिनपगारी रजेवर 1 डिसेंबरपासून पाठवण्यात येणार आहे. जेट एअरवेजचे सीईओ संजीव कपूर आपल्या ट्विटमध्ये म्हणाले, कंपनीतील 10 टक्क्याहून कमी कर्मचाऱ्यांच्या वेतनाशिवाय तात्पुरत्या रजेवर पाठवण्यात येणार आहे. तसेच एक तृतीयांश कर्मचारी तात्पुरत्या वेतन कपातीवर असतील.
सीईओ संजीव कपूर यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन तृतीयांश कर्मचार्यांवर कोणताही परिणाम झालेला नाही किंवा कोणत्याही कर्मचार्याला कंपनी सोडण्यास सांगितले गेले नाही. जेट एअरवेजमध्ये सध्या 250 कर्मचारी काम करतात.