बाबरी मशिदप्रकरणी सीबीआय कोर्टाचा मोठा निर्णय; सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता

नवी दिल्ली – अयोध्येमध्ये 1992 साली बाबरी मशिद उद्‌ध्वस्त केल्याप्रकरणी सर्व आरोपींची आज निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. लखनऊच्या विशेष सीबीआय न्यायालयाने तब्बल २८ वर्षानंतर हा निकाल दिला. यामुळे भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांच्यासह अन्य आरोपींना मोठा दिलासा मिळाला आहे.

बाबरी मशिद उद्‌ध्वस्त केल्याप्रकरणी तब्बल २००० पानांचा निकाल कोर्टात वाचण्यात आला. यामध्ये बाबरी मशीद पाडण्याचा पूर्वनियोजित कट नव्हता, बाबरी पाडण्याची घटना अचानक घडली असे निरीक्षण न्यायाधीशांनी नोंदवला. तसेच आरोपींविरोधात कोणताही पुरेसे पुरावा नसल्याचे सांगण्यात आले.

या आरोपींमध्ये माजी उपपंतप्रधान लालकृष्ण आडवाणी, माजी केंद्रीय मंत्री मुरली मनोहर जोशी आणि उमा भारती, उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांच्याशिवाय विनय कटियार आणि साध्वी ऋतंभरा यांचा समावेश आहे. उमा भारती आणि कल्याण सिंह यांना करोना विषाणूची लागण झाली असल्यामुळे त्यांना वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे. राम मंदिर उभारणीसाठीच्या प्रभारी ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय हेही आरोपींमध्ये आहेत. सुनावणीवेळी साध्वी ऋतंभरा यांच्यासमवेत १८ आरोपी कोर्टात उपस्थित होते तर अडवाणी यांच्यासह काही व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून उपस्थित होते. 

सीबीआयने ३५१ साक्षीदार आणि पुरावा म्हणून ६०० कागदपत्रे न्यायालयासमोर सादर केले आहेत. ४८ जणांवर आरोपपत्र दाखल केले गेले. मात्र खटल्यादरम्यान १७ जणांचा मृत्यू झाला आहे. 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.