दिसपूर – आसाममध्ये आता मुस्लिमांना लग्न आणि घटस्फोटाची नोंदणी करावी लागणार आहे. आसाम सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे मुस्लीम समाजातील काझींची भूमिका संपणार असल्याचे बोलले जात आहे.
याबाबत आसामचे मुख्यमंत्री हिंमत बिस्वा सरमा यांनी सांगितले की, राज्यात मुस्लिमांची लग्न आणि घटस्फोटासाठी सरकारी नोंदणी अनिवार्य असेल. यासाठी विधानसभेच्या आगामी सत्रात एक विधेयक आणले जाईल. यापूर्वी मुस्लीम मुस्लीम लग्न काझींच्या माध्यमातून नोंद केले जात होते. मात्र या नव्या विधेयकामुळे मुस्लीम समाजातील सर्व विवाहांची नोंदणी सरकारअंतर्गत होईल.
मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी सांगितले की, यापूर्वी काझी अल्पवयीन मुलींच्या लग्नाची नोंदणी करीत होते. मात्र आगामी विधेयकात यावर निर्बंध आणले जातील. त्यांनी कॅबिनेटच्या निर्णयाचा हवाला देत सांगितले की, यापुढे कोणत्याही अल्पवयीनच्या लग्नाची नोंद केली जाणार नाही.
दरम्यान, सरकार आगामी सत्रात आसाम मुस्लीम निकाह अनिवार्य नोंदणी आणि घटस्फोट विधेयक, 2024 सादर करणार आहे.