मुंबई – राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा आज अखेर सुटला असून देवेंद्र फडणवीस यांनी आज सकाळी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तर धक्कादायक बाब म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या शपथविधीवेळी राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे आणि सुनील तटकरे उपस्थित असल्यामुळे राष्ट्रवादीला मोठं खिंडार पडले असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.
धनंजय मुंडे कालपासून संपर्कात नसल्याची माहिती सूत्र देत आहेत. तसेच धनंजय मुंडे गुरुवारी देवेंद्र फडणवीस यांना भेटले असल्याची माहितीही समोर येत आहे. राजकीय घडामोडीतून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर पुणे जिल्ह्यातील इंदापुरचे आमदार दत्तात्रय भरणे हेही अजित पवार यांच्या गटामागे गेल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, अजित पवार यांना पाठिंबा देणारे नेते कोण याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहेत. राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांना ४ वाजता मुंबईत हजर राहण्याचे आदेश पक्षश्रेष्ठीकडून देण्यात आले आहेत.