अहमदाबाद – गुजरातमध्ये पुन्हा कोट्यवधी किमतीचा अंमली पदार्थ साठा आढळला. त्या राज्यातील मुंद्रा बंदरावरून 376 कोटी रूपयांचे 75 किलो हेरॉईन जप्त करण्यात आले. ती कारवाई गुजरात दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) केली.
मुंद्रा बंदरालगत असणाऱ्या कंटेनरमध्ये हेरॉईनचा साठा आढळला. कपड्यांच्या गुंडाळ्यांमध्ये तो दडवण्यात आला होता. तो साठा संयुक्त अरब अमिरातीमधून (यूएई) पाठवण्यात आल्याचे निष्पन्न झाले. मुंद्रा बंदरावरून तो पंजाबला पाठवला जाणार होता. मात्र, त्याआधीच तो जप्त करण्यात आला.
पंजाब पोलिसांनी गुजरात एटीएसला दिलेल्या माहितीच्या आधारे ती कारवाई करण्यात आली. मुंद्रा बंदरावर सुमारे दोन ते अडीच महिन्यांपूर्वी परदेशातून दाखल झालेल्या कंटेनरमध्ये अंमली पदार्थ असण्याचा अंदाज पंजाब पोलिसांनी वर्तवला होता. तो कारवाईवेळी आढळलेल्या हेरॉईन साठ्यामुळे खरा ठरला.
गुजरातमधील मुंद्रा आणि इतर बंदरांवर मागील काही महिन्यांत कोट्यवधींचे अंमली पदार्थ साठे आढळले. मागील वर्षी सप्टेंबरमध्ये मुंद्रा बंदरावरील दोन कंटेनर्समध्ये तब्बल 21 हजार कोटी रूपयांचे 3 हजार किलो हेरॉईन जप्त करण्यात आले. त्याच बंदरावर चालू वर्षी मेमध्ये 500 कोटी रूपयांचे 56 किलो कोकेन हस्तगत करण्यात आले. तर, एप्रिलमध्ये कांडला बंदरावर 1 हजार 439 कोटी रूपयांचे हेरॉईन आढळले.