नवी दिल्ली : देशात तुम्ही कुठेही गेलात तर तुमची ओळख एकाच गोष्टीने होते, ती म्हणजे आधार कार्ड… या आधार कार्डमध्ये काळानुसार अनेक बदल होत आहेत. त्यातच आता आधार कार्डामध्ये एक मोठा बदल करण्यात आला आहे. जर तुम्ही आधार कार्डमध्ये बदल करणार असाल तर वडिलांशी किंवा पतीशी असलेल्या नात्याची ओळख यापुढे कार्डमध्ये उघड होणार नाही. आधार कार्डावरुन आता नात्यांची ओळख पटणार नाही.
आता याचा वापर केवळ ओळख पटवण्यासाठीच होईल. आधार कार्डावर आता वडिल किंवा पतीच्या नावासमोर ‘केयर ऑफ’ लिहून येईल. काही दिवसांपूर्वी एका व्यक्तीने आपल्या घराचा पत्ता बदलल्यामुळे आपल्या कुटुंबियांचे आधार कार्ड अपडेट केले. ज्यामध्ये वडिलांसोबतच्या नात्याऐवजी ‘केअर ऑफ’ असे लिहून आले. त्यांना वाटलं की, हे चुकून झाले आहे. परंतु, त्यानंतर जेव्हा त्यांनी आधार सेंटरवर जाऊन त्याबाबत सांगितले त्यावेळी समजलं की, ही चूक नसून बदललेल्या नियमामुळे असे दिसत आहे.
आधार कार्ड अपडेटसाठी अधिकृत CSC चे व्यवस्थापक संचालक दिनेश त्यागी यांनी सांगितले की, आता आधार कार्डासाठी वडील, मुलगा, मुलगी यांच्याऐवजी ‘केअर ऑफ’ असे लिहून येणार आहे. अर्जदार यामध्ये कोणाचेही नाव देऊ शकत नाही. आधार कार्डावर कोणतेही नाते दर्शवले जाणार नाही. तसेच अर्जदार आधार कार्ड फक्त नाव आणि पत्ता देऊन अपडेट करू शकतात. आधार कार्ड कोणतेच संबंध निश्चित करणार नाही, असेही त्यांनी सांगितले आहे.
UIDAI च्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, 2018 मध्ये आधार कार्डाबाबत सुप्रीम कोर्टाने एक महत्त्वाचा निर्णय दिला होता. ज्यात लोकांच्या खाजगी आयुष्याबाबत म्हटले गेले होते. त्याच निर्णयाच्या आधारे कार्डावर अर्जदाराचे नातेसंबंध स्पष्ट केले जाणार नाही. हे बदल कधीपासून लागू करण्यात आले, याबाबत UIDAI ने कोणतीही माहित दिलेली नाही.