नवी दिल्ली : ऑनलाईन पद्धतीने पैसे पाठवण्यासाठी वापरली जाणारी एनईएफटी सेवा आजपासून दिवसाचे 24 तास आणि आठवड्याचे सातही दिवस ग्राहकांना उपलब्ध असणार आहे. रिझर्व्ह बॅंकेने आधीच याची घोषणा केली होती. 16 डिसेंबरपासून ही सुविधा 24 तास उपलब्ध करण्यात येणार असल्याचे बॅंकेकडून सांगण्यात आले होते.
एनईएफटीच्या माध्यमातून सकाळी आठ ते संध्याकाळी सात या वेळेतच ग्राहकांना आपल्या खात्यातून ऑनलाईन पद्धतीने दुसरीकडे पैसे पाठवता येत होते. रात्रीच्या वेळी किंवा सुटीच्या दिवशी ही सेवा उपलब्ध नसल्याने अनेक ग्राहकांची अडचण होत होती. त्यामुळे ही सेवा 24 तास सुरु करावी अशी मागणी आधीपासून होत होती. त्याला अखेर सुरुवात होणार आहे.
सर्व बॅंकांना एनईएफटीच्या माध्यमातून होणारे व्यवहार सुरळीत होण्यासाठी चालू खात्यात पर्याप्त पैसे ठेवण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्याचबरोबर 24 तास एनईएफटी सुरू झाल्यानंतर ही सुविधा कायम सुरळीत राहावी, यासाठी आपल्या पायाभूत सुविधांमध्ये तातडीने आवश्यक बदल करण्याचे निर्देशही बॅंकांना देण्यात आले होते. एनईएफटी आणि आरटीजीएस या माध्यमातून पाठविण्यात येणाऱ्या पैशांवर कोणतेही शुल्क न आकारण्याचा निर्णय रिझर्व्ह बॅंकेने आधीच घेतला आहे.