नागपुर – देशातल्या बॅंकिग क्षेत्रापुढे मोठे आव्हान आहे. ठेवींवर व्याज देणेही बॅंकांसाठी आव्हानात्मक ठरत आहेत असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले आहे. इंडीयन बॅंकेच्या झोनल ऑफिसच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
लोकांनी बॅंकांना आपली देणी वेळेवर देऊन सहकार्य करणे अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले. बॅंकांनीही विविध कल्याणकारी योजने अंतर्गत मंजुर झालेली कर्जे वेगाने लोकांना अदा केली पाहिजेत अशीही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. मध्यम आणि छोट्या उद्योग प्रकल्पांमध्ये हॅंडलूम आणि हॅंडीक्राफ्ट उद्योगाला मोठ्या प्रमाणात चालना देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
त्याच्या काही योजना सरकारकडे तयार असल्याचे सांगून ते म्हणाले की विदर्भात सोलर चरखा क्लस्टर उभारले जाणार आहे. त्यातून एक्स्पोर्ट क्वालिटीचे तयार कपडे बनवले जातील आणि त्यातून विदर्भातील अर्थकारणाला चालना देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे असे ते म्हणाले. नागुपरातील मिहान प्रकल्पाला जादा जागा देण्याचाही प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन असल्याचे गडकरी यांनी यावेळी सांगितले.