मुंबई : भाजपाचे आमदार नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्यानंतर आज राणे जिल्हा न्यायालयात हजर झाले आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचे प्रचारप्रमुख संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्लाप्रकरणी नितेश राणे यांचा अटकूपर्व जामीन अर्ज सर्वोच्च न्यायालयाने काल फेटाळला होता. त्यानंतर आज नितेश राणे न्यायालयात शरण आले आहेत.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार, नितेश राणे सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयात हजर झाले. यावेळी त्यांचे बंधू माजी खासदार निलेश राणेही सोबत आहेत. यावेळी नितेश राणे नियमित जामीनसाठी अर्ज करतील. नितेश राणेंसोबत त्यांचे वकील सतीश मानशिंदेही उपस्थित आहेत. त्यामुळे नितेश राणेंना दिलासा मिळणार की कारवाई होणार हे पहावे लागणार आहे.
नितेश राणेंनी सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र उच्च न्यायालयातही नितेश राणेंना जामीन नाकारण्यात आला. त्यानंतर नितेश राणेंनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाकडूनही नितेश राणे यांना दिलासा मिळालेला नाही.
सर्वोच्च न्यायालयाने नितेश राणेंना योग्य कोर्टात दाद मागावी असा सल्ला दिला. नितेश राणे यांच्या वतीने ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी यांनी सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद केला. तर सरकारच्या बाजूने अभिषेक मनू सिंघवी सर्वोच्च न्यायालयात उपस्थित होते.