बिग ब्रेकिंग! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेणार गृहमंत्री अमित शाह यांची भेट

मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे रविवारी एका दिवसाच्या दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत. यावेळी ते दिल्लीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार आहेत. रविवारी सकाळच्या पहिल्या सत्रामध्ये ही भेट होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. ही भेट राजकीय कारणासाठी नसून राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने महत्वाच्या असणाऱ्या नक्षवाद्यांसंदर्भातील विषयावर असणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

२६ सप्टेंबर रोजी सकाळी मुख्यमंत्री मुंबईहून दिल्लीला रवाना होणार आहेत. दिल्लीमध्ये ते शाह यांची भेट घेणार आहेत. केंद्रीय गृहमंत्री असणारे शाह हे सध्या नक्षवादाची समस्या असणाऱ्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या भेटी घेऊन या विषयासंदर्भात केंद्र आणि राज्य सरकारला एकत्रित कशापद्धतीने काम करता येईल याबद्दलची चर्चा करत आहेत. याच विषयावर चर्चा करण्यासाठी रविवारी उद्धव ठाकरे आणि अमित शाह भेटणार आहेत.

महाराष्ट्रामधील मुंबई, नागपूरसारख्या शहरी भागांमध्ये नक्षवादी नेटवर्क वाढण्याची शक्यता गुप्तचर यंत्रणांनी व्यक्त केली आहे. तसेच दिल्लीमध्येही नक्षलवादी कारवाया वाढतील अशी भीती व्यक्त केली जातेय. याचसंदर्भात चर्चा करण्यासाठी शाह आणि उद्धव ठाकरेंची भेट होणार आहे.

नक्षलवादाची समस्या असणाऱ्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाल्यानंतर अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्वतंत्र बैठक होणार की नाही यासंदर्भात कोणतीही माहिती देण्यात आली नसली तरी अशी बैठक घेतली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मुख्यमंत्र्यांसोबतच्या चर्चेमध्ये कोणत्या मुद्द्यांबद्दल बोलणे झाले आणि पुढील कारवाई निर्णय कसे आणि काय घ्यावेत याबद्दल गृहमंत्री आणि पंतप्रधानांमध्ये चर्चा होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.

सध्या महाराष्ट्रामधील गडचिरोली आणि चंद्रपूरसारख्या भागांमध्ये नक्षलवादाची समस्या प्राकर्षाने दिसून येत आहे. या भागांमध्ये विकास कामांना गती देण्यास केंद्राचे तसेच राज्याचे प्राधान्य आहे. मात्र आता नक्षलवादाची समस्या मोठ्या शहरांमध्ये निर्माण होऊ शकते अशी भीती गुप्तचर यंत्रणांनी व्यक्त केली असल्याने या गंभीर मुद्द्यावर केंद्र आणि राज्यांनी एकत्र काम करण्याची गरज असून पुढील वाटचाल कशी असावी यासंदर्भात चर्चा करण्यासाठी केंद्राकडून राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना दिल्लीत बोलावण्यात आले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.